पाली : लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पाली आणि लक्ष्मी एज्युकेशनल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. आयोजक नवनाथ पवार यांच्या सहकार्याने सुधागड तालुक्यातील तिवरे येथे दिनांक ३० सप्टेंबर रोजी भरविण्यात आलेल्या या शिबिराला स्थानिक ग्रामस्थ व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन नेत्रतज्ज्ञ डॉ. धनंजय यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यांनी शिबिराचे संयोजक म्हणून मार्गदर्शन करत नेत्र आरोग्य जपण्यासाठी दैनंदिन जीवनशैलीतील सवयी व खबरदारी याबाबत नागरिकांना सविस्तर माहिती दिली. शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख मिलिंद देशमुख व माजी सरपंच मनोहर देशमुख यांची उपस्थिती शिबिराला लाभली.
या शिबिरात एकूण ६० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. तपासणी दरम्यान रुग्णांना मोफत औषधोपचार, चष्मे तसेच नेत्र आरोग्याविषयी मार्गदर्शन देण्यात आले.
शिबिरात विशेषतः नेत्र तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची डोळ्यांची संपूर्ण तपासणी करण्यात आली. काही रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी रेफर करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी लक्ष्मी ट्रस्ट नेत्र रुग्णालय, पनवेलचे लक्ष्मी ट्रस्टचे डॉ. धनजय, शिबीर संयोजक दत्तात्रेय ठाकूर व कॉन्सलर कु· सोनिया माळी तसेच स्थानिक स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. नागरिकांनीही या शिबिराचे कौतुक करत अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
