श्रीवर्धन प्रशासनाकडून पंचनामे करण्याची मागणी
गणेश प्रभाळे
दिघी : मागील तीन दिवसातील वादळी पावसाच्या संकटाने श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन व कोंडेपंचतन येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहे.
शासनाच्या निर्देशाने श्रीवर्धन प्रशासनाकडून तातडीने भातशेतीचे पंचनामे करण्यात यावे. मात्र, अद्याप पंचनामे झाले नसल्याने मदत कशी मिळणार, या चिंतेत शेतकरी सापडला आहे. बोर्ली परीसरातील तयार झालेले भातपीक पुर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याची माहीती अद्याप प्रशासनाला मिळाली नसल्याची माहिती शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
यावेळी परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक संपुर्णपणे वाया गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी येणार असून उन्हाळ्यात गुरांच्या चाऱ्या अभावी गुरे कशी जगवायची हा प्रश्नसुध्दा शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांची अवस्था यावेळी खुपच बिकट बनली असल्याने त्यांना या अवस्थेत आधार मिळावा म्हणून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी. अशी मागणी करण्यात येत आहे.
