• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावात खा. सुनील तटकरे यांनी नाराज कार्यकर्त्यांची घेतली भेट : सकारात्मक चर्चेनंतर नाराजी शमल्याचे संकेत

ByEditor

Oct 2, 2025

माणगाव । सलीम शेख
माणगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांनंतर निर्माण झालेली नाराजी अखेर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने थेट संवाद साधून शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. खा. सुनील तटकरे यांनी माणगावातील नाराज कार्यकर्त्यांची भेट घेतली असून या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आनंदशेठ यादव यांनी दिली.

नाराज कार्यकर्त्यांची खुलेपणाने मांडणी

काही दिवसांपूर्वी (दि. २९ सप्टेंबर) माणगावात आयोजित आढावा बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांच्या घोषणेनंतर जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. अनेक जुने कार्यकर्ते पदवाटपात दुर्लक्षित झाल्याची भावना व्यक्त करत होते. इतकेच नव्हे तर “दसऱ्यानंतर सीमोल्लंघन करू” अशी चर्चा देखील शहरभर पसरली होती. ही माहिती वृत्तपत्रांतून व सोशल मिडियावर गाजल्यानंतर खा. तटकरे यांनी स्वतः पुढाकार घेत दि. १ ऑक्टोबर रोजी माणगाव शासकीय विश्रामगृह येथे नाराज कार्यकर्त्यांची विशेष बैठक बोलावली.

बैठकीत कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे आपली मते मांडली. “आम्ही अनेक वर्ष तन, मन, धन अर्पण करून पक्षाची निष्ठेने सेवा केली आहे. पक्षाच्या आदेशाला कधीही विरोध केला नाही. तरीदेखील शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही. जुन्या कार्यकर्त्यांना न्याय मिळालाच पाहिजे,” अशी भूमिका नाराज कार्यकर्त्यांनी मांडली.

खा. तटकरे यांची दिलासादायक भूमिका

कार्यकर्त्यांच्या या कैफियत ऐकल्यानंतर खा. सुनील तटकरे यांनी सर्वांना धीर देत म्हटले की, “आपण कोणत्याही प्रकारे नाराज होऊ नका. तुमच्या सर्वांच्या भावना व योगदानाची योग्य दखल पक्ष नक्की घेईल. मी, आमदार आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आता आपण सर्वांनी एकदिलाने, नाराजी बाजूला ठेवून संघटन मजबूत करण्यासाठी कामाला लागा,” असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीला माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा उपाध्यक्ष नितीन वाढवळ, माजी नगराध्यक्ष तथा महिला शहराध्यक्षा योगिता चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, संदीप खरंगटे, दिलीप जाधव, नगरसेविका लक्ष्मी हिलम, माजी नगरसेवक जयंत बोडेरे, युवानेते सुमित काळे, उपनगराध्यक्षा हर्षदा काळे, सोशल मिडिया समन्वयक केशरी हिरवे, चेतन गवाणकर, विठोबा पालकर, राकेश पवार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

नाराजी शमण्याचे संकेत

बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर पक्षात निर्माण झालेली नाराजी मोठ्या प्रमाणात शमल्याचे चित्र दिसून आले आहे. आगामी काळात माणगावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकजुटीने काम करेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!