भूमिपूजन समारंभातून मंत्री भरत गोगावलेंचा पत्ता कट
महाड । मिलिंद माने
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील इंदापूर आणि माणगाव बायपासच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून पुन्हा एकदा शिंदे गटाची शिवसेना विरुद्ध अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत. यावेळी निमंत्रण पत्रिकेत महाडचे आमदार व राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचे नाव डावलण्यात आले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचाच बोलबाला दिसून येत आहे.
महामार्गाचे रखडलेले काम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या कामाला तब्बल १८ वर्षे झाली तरी काम पूर्णत्वास आलेले नाही. त्यामुळे दररोज प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून इंदापूर आणि माणगाव शहरातून जाणारा अरुंद रस्ता स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. व्यापारी बाजारपेठ, स्थानिक व राष्ट्रीय वाहतूक या सर्वांची कोंडी होत असल्याने जनतेच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत.
जन आक्रोश समितीच्या सातत्यपूर्ण आंदोलनानंतर अखेर सरकार जागे झाले. मात्र, या महामार्गावरून अनेक लोकप्रतिनिधी प्रवास करीत असतानाही त्यांनी १८ वर्षांत गप्प बसल्याची टीका जनतेतून होत आहे.

तटकरे कुटुंबाची आघाडी
रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावल्याचा दावा केला जात आहे. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता इंदापूर पुलासमोर व दुपारी २.३० वाजता माणगाव रेड्डीज हॉटेलसमोर बायपासचे भूमिपूजन होणार आहे.
निमंत्रण पत्रिकेत भाजपचे एकमेव खासदार धैर्यशील पाटील व तटकरे कुटुंब (खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, अनिकेत तटकरे) यांची नावे ठळकपणे आहेत. याशिवाय राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांचीच नावे दिसत असल्याने कार्यक्रमावर राष्ट्रवादीचा बोलबाला आहे.
गोगावलेंचा पत्ता कट?
रोहा येथील चिंतामणराव देशमुख सभागृहाच्या नूतनीकरणाच्या भूमिपूजनावेळीही मंत्री भरत गोगावले यांचे नाव निमंत्रण पत्रिकेतून वगळण्यात आले होते. त्याचीच पुनरावृत्ती इंदापूर व माणगाव बायपासच्या कार्यक्रमात झाली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जन आक्रोश समितीचा सवाल
जन आक्रोश समितीने या भूमिपूजन कार्यक्रमावरही सरकारवर टीका केली आहे. महामार्गाचे काम १८ वर्षांपासून रखडलेले असून, दरवर्षी फक्त घोषणा होत आहेत. केवळ भूमिपूजन नको, तर तातडीने काम मार्गी लावावे. कोकणातील जनतेला खड्ड्यांनी त्रस्त केले असून नेते मात्र गप्प का, असा थेट सवाल समितीने विचारला आहे.
एकूणच, इंदापूर व माणगाव बायपासचे भूमिपूजन हा केवळ विकासाचा प्रश्न न राहता राजकीय रंग घेऊ लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशा स्वरूपात हा संघर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अधिक पेटण्याची शक्यता आहे.
