महाड । मिलिंद माने
महाड तालुक्यातील एका वाडीमध्ये घडलेली १० वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना संपूर्ण रायगड जिल्ह्याला हादरवून टाकणारी ठरली आहे. महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, ही घटना त्या चिंतेत भर टाकणारी आहे.
सदर घटना मंगळवारी (२ ऑक्टोबर) महाड तालुक्यातील एका दुर्गम वस्तीमध्ये घडली. सचिन पांडुरंग सुतार (वय ३७, रा. कुंभारकोंड, वरंध, ता. महाड) हा आरोपी सुतारकामासाठी त्या वाडीत गेला होता. पीडित मुलीची आई मजुरीसाठी बाहेर गेली होती आणि वडील भोर येथे गेले होते. घरात मुलगी एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.
अत्याचारानंतर आरोपीने पीडितेला धमकी दिली की, “ही घटना कोणाला सांगितलीस तर तुला ठार मारीन.” या भीतीमुळे मुलगी काही काळ गप्प राहिली, मात्र नंतर तिने आईला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. के. मुंढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केला आहे. पीडित मुलीची आरोग्य तपासणी फॉरेन्सिक टीममार्फत करण्यात आली असून, त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३७६(ख), ३७६(क), ५०६ तसेच POCSO कायदा २०१२ अंतर्गत कलम ४, ६, ८, १० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी सचिन सुतारला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिक आणि पीडितेचे नातेवाईक करत आहेत. “अशा नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी,” अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
