अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा येथील घटना; दोघांवर गुन्हा दाखल
रायगड । अमुलकुमार जैन
वाढदिवस साजरा करण्याच्या आनंदात तलवारीने केक कापण्याचा अविचार अलिबाग तालुक्यातील दोन तरुणांना चांगलाच महागात पडला आहे. वाढदिवसाच्या केक कटिंगचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोघांविरोधात पोयनाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले?
दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास, अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा, बंगला बंदर येथे संकेत प्रल्हाद पाटील (वय ३४, रा. बहिरीचा पाडा) याने आपल्या मित्रपरिवारासह वाढदिवस साजरा केला. या वेळी कार (क्रमांक MH-06/BV-1404) च्या बोनेटवर केक ठेवून त्याने उजव्या हातात तलवार घेऊन केक कापला.
दरम्यान, जमावबंदीचे आदेश असतानाही सार्वजनिक ठिकाणी तलवार बाळगणे व मद्यसेवन करत उत्सव साजरा केल्यामुळे हा प्रकार बेकायदेशीर ठरला. संकेत पाटील याचा मित्र सुनील पांडुरंग पाटील (वय ४२, रा. बंगला बंदर, ता. अलिबाग) हा देखील वाढदिवसाच्या पार्टीत सार्वजनिक ठिकाणी दारू प्याल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे.
फिर्यादी देवेंद्र जयवंत भोईर (वय ३४, व्यवसाय–नोकरी, नेमणूक – पोयनाड पोलिस ठाणे) यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून ही माहिती वरिष्ठांना दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार कल्पेस नलावडे अधिक तपास करीत आहेत.
दोन्ही आरोपींवर भारतीय हत्यारबंदी अधिनियम १९५९ कलम ४, २५, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ८५, मुंबई पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ (१)(३)(अ) कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात जमावबंदी व हत्यारबंदीचे आदेश लागू केलेले असताना या आदेशाचे उल्लंघन केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
संकेत प्रल्हाद पाटील याच्यावर याआधीही २०१४ साली अलिबाग पोलिस ठाण्यात सी.आर. ६४/२०१४ अन्वये भा.द.वि. कलम ३५४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
तलवारीने केक कापण्याची “फॅशन”
अलिबागसह राज्यभरात काही ठिकाणी तलवारीने केक कापणे हे तथाकथित शौर्याचे किंवा प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. काही तरुणांमध्ये ही “फॅशन” लोकप्रिय झाली असून अशा प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, यामुळे कायद्याचे उल्लंघन होऊन अशा तरुणांवर गुन्हे दाखल होण्याचे प्रकार वाढले आहेत.
