रेवदंडा बाजारपेठेत मोटरसायकलची जोरदार धडक; पारसमल जैन यांचा मृत्यू
रायगड | अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील महामार्गांवर तसेच अंतर्गत रस्त्यांवर दररोज घडणाऱ्या अपघातांमुळे निरपराध नागरिकांचे प्राण जात आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना अलिबाग तालुक्यातील रेवदंडा बाजारपेठेत घडली असून या अपघातात ७५ वर्षीय पारसमल बाबूलाल जैन (रा. रेवदंडा बाजारपेठ, ता. अलिबाग, जि. रायगड) यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात सहभागी असलेला वाहनचालक रत्नेश रामबाबू निशाद (वय २३, सध्या रा. रेवदंडा मोठे बंदर, मूळ रा. साढापूर देवढ, जि. सुलतानपूर, उत्तरप्रदेश) याच्याविरुद्ध रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, मयत पारसमल बाबूलाल जैन यांचे रेवदंडा बाजारपेठेतील केळकर बस स्टॉपजवळ दुकान आहे. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे आठच्या सुमारास ते दुकान बंद करून आपल्या निवासस्थानाकडे पायी निघाले होते. त्यावेळी रेवदंडा बाजूकडून मुरुडकडे जाणारी होंडा शाईन (क्र. MH-06-CN-3844) ही मोटरसायकल वेगाने येत होती. मोटरसायकल चालक रत्नेश रामबाबू निशाद याने रस्त्याची परिस्थिती न पाहता अविचाराने, निष्काळजीपणे व बेदरकारपणे मोटरसायकल चालवत पारसमल जैन यांना ठोकर मारली. हा अपघात रेवदंडा बाजारपेठेतील डॉ. अमर पाटील यांच्या दवाखान्यासमोर घडला. जोरदार धडकेमुळे पारसमल जैन गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी डॉ. अमर पाटील यांच्या दवाखान्यात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचे शवविच्छेदन अलिबाग जिल्हा रुग्णालयात करण्यात आले.
या अपघाताबाबत मयत पारसमल बाबूलाल जैन यांचे पुत्र किशोर पारसमल जैन (वय ५०, रा. रेवदंडा बाजारपेठ) यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक १३१/२०२५ भा.दं.वि. कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत नोंदवला आहे. या अपघाताचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आंगज करीत आहेत.
या घटनेमुळे रेवदंडा बाजारपेठेत हळहळ व्यक्त केली जात असून, गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहतूक शिस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
