दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर करा, अन्यथा आंदोलन तीव्र होईल; शेकापच्या विराट मोर्चाची तयारी
रायगड । अमुलकुमार जैन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास विमान उडू देणार नाही, असा थेट इशारा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिला आहे. विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव उद्घाटनाच्या दिवशीच जाहीर करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
अलिबाग येथील शेतकरी भवन येथे शनिवारी (दि. ४) विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी शेकाप नेते पाटील बोलत होते. बैठकीस शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, जिल्हा सहचिटणीस अॅड. गौतम पाटील, सदस्य अनिल पाटील, अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, शेतकरी सभा अध्यक्ष अनिल गोमा पाटील, अॅड. विजय पेढवी, संजय पाटील आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाटील म्हणाले, “जेएनपीटी प्रकल्पावेळी दिलेली साडेबारा टक्के जमिनीची आश्वासने अजूनही पूर्ण झालेली नाहीत. त्या अनुभवातून आम्हाला पोकळ वचनांवर विश्वास ठेवायचा नाही. नवी मुंबई विमानतळासाठी परिसरातील १२ हून अधिक गावे उठविली, हजारो एकर जमीन घेतली, आणि स्थानिकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले गेले. आता तेच आश्वासन पूर्ण व्हावे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या बुधवारी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भरती होणार असून, किमान ८० टक्के भरती स्थानिक तरुण–तरुणींमधूनच झाली पाहिजे, अशी मागणी जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत केली. त्यांनी सांगितले की, “पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील अनेक तरुण उच्च शिक्षित आहेत. त्यांच्या हक्काच्या संधी बाहेरच्यांना देऊ नयेत. स्थानिक भूमीपुत्रांचा रोजगाराचा हक्क आम्ही सोडणार नाही.”
याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसच्या नेत्यांशीही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. “लवकरच पनवेल येथे विराट मोर्चाचे नियोजन ठरणार आहे. सर्व आघाड्यांच्या एकत्रित भूमिकेतून हे आंदोलन तीव्र होईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाटील म्हणाले, “दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. उद्घाटनाच्या दिवशीच सरकारने त्याचे अधिकृत नामकरण जाहीर करावे. अन्यथा लोकशक्तीचा ज्वालामुखी उफाळून येईल.”
पंचनामे तात्काळ करा — जयंत पाटील
रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, अशी तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी जयंत पाटील यांच्याकडे केली. त्यांनी तत्काळ तहसीलदार विक्रम पाटील यांच्याशी संपर्क साधून पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.
खड्डेमय रस्त्यांविरोधात रस्ता रोकोचा इशारा
अलिबाग–पेण, अलिबाग–रोहा, अलिबाग–मुरूड मार्गांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या रस्त्यांवर २२ कोटी रुपये खर्चूनही काम निकृष्ट झाले, अशी टीका पाटील यांनी केली. “दलालांच्या टक्केवारीत कामे होत आहेत, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शासनाने गांभीर्याने घेतले नाही, तर शेकापच्या वतीने लवकरच रास्ता रोको आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
