स्थानिक युवकांना रोजगार व व्यवसाय क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम
श्रीवर्धन | अनिकेत मोहित
स्थानिक मराठी युवकांना रोजगार आणि व्यवसाय क्षेत्रात संधी मिळावी, यासाठी ‘भूमीपुत्र श्रीवर्धन’ ही नव्या पिढीची संघटना स्थापन करण्यात आली असून, अल्पावधीतच या संघटनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक स्थानिक युवकांनी सभासद नोंदणी करून संघटनेवर आपला विश्वास व्यक्त केला आहे.
संघटनेचा प्रमुख उद्देश म्हणजे श्रीवर्धनमधील प्रत्येक उद्योग, व्यवसाय आणि प्रकल्पामध्ये स्थानिक भूमीपुत्रांना प्राधान्य मिळवून देणे. यासाठी संघटना विविध स्तरांवर सक्रिय आहे. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच स्वावलंबनाच्या दिशेने प्रेरित करणे हे या संघटनेच्या प्राथमिक कार्यात येते.
‘भूमीपुत्र श्रीवर्धन’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “श्रीवर्धनच्या मातीत जन्मलेल्या प्रत्येक तरुणाला आपल्या गावातच सन्मानाने काम करण्याची संधी मिळावी, हीच आमची लढाई आहे.”
लवकरच संघटनेच्या विभागनिहाय सभा आयोजित करण्यात येणार आहेत. या सभांमध्ये स्थानिक समस्यांवर चर्चा होईल तसेच युवकांना शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन देण्याचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. संघटनेतर्फे स्थानिक रोजगार निर्मितीसह विविध प्रशिक्षण कार्यक्रमांवरही भर देण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
युवकांनी स्थानिक उद्योगात काम करून स्वावलंबी होण्यास प्रोत्साहित करण्यासाठी संघटनेने अनेक प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली असून, या उपक्रमामुळे स्थानिक तरुणाईला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘भूमीपुत्र श्रीवर्धन’ आता स्थानिक अस्मिता, रोजगार हक्क आणि व्यवसाय विकासासाठीचा आवाज बनत असून, संघटनेच्या माध्यमातून येत्या काळात श्रीवर्धनमधील युवकांना नव्या व्यावसायिक व सामाजिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

Required job back office
खूप छान!
आपल्या कायासाठी शुभेच्छा!
उद्योग, व्यवसाय बरोबरच नोकरमध्ये सुद्धा स्थानिकांना प्राधान्य मिळाले पाहिजे.
खूप छान!
आपल्या कायासाठी शुभेच्छा!
उद्योग, व्यवसाय बरोबरच नोकरमध्ये सुद्धा स्थानिकांना प्राधान्य मिळाले पाहिजे.