रायगड : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाने आता अधिक तीव्रता धारण केली असून, भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र–गोवा किनारपट्टीसाठी दूरस्थ धोक्याची सूचना क्रमांक २ (Distant Warning Signal No. II – DW-II) जारी केली आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील सर्व बंदरांवर लाल इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता हे चक्रीवादळ ईशान्य अरबी समुद्रावरून वायव्य दिशेने सरकत होते. त्यावेळी ते २२.० अंश उत्तर अक्षांश आणि ६६.४ अंश पूर्व रेखांशावर केंद्रित होते. गेल्या सहा तासांत त्याची गती अंदाजे ८ किमी प्रतितास नोंदवली गेली.
चक्रीवादळाचे केंद्र द्वारका (गुजरात) च्या पश्चिमेस सुमारे २८० किमी, पोरबंदरच्या पश्चिमेस ३२० किमी, आणि कराची (पाकिस्तान) च्या दक्षिणेस सुमारे ३३० किमी अंतरावर असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, हे चक्रीवादळ पुढील काही तासांत वायव्य आणि नंतर पश्चिम–वायव्य दिशेने सरकून तीव्र चक्रीवादळात (Severe Cyclonic Storm) परिवर्तित होण्याची शक्यता आहे. शनिवारी, ४ ऑक्टोबरच्या सकाळी त्याची तीव्रता वाढून ते उत्तर आणि मध्य अरबी समुद्राच्या मध्य भागाकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
दरम्यान, डहाणूपासून ते मार्मागोवा (Marmugao) पर्यंतच्या सर्व बंदरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे, तसेच किनारपट्टीवर योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाचे पुढील अद्यतन ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ५:३० वाजता प्रसिद्ध केले जाणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
