• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

छुप्या मार्गाने रेशनिंग धान्याची अवैध विक्री; कोलाड पोलिसांची धडक कारवाई, ५ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

ByEditor

Oct 6, 2025

कोलाड । विश्वास निकम
छुप्या मार्गाने रेशनिंग धान्याची अवैध विक्री करणाऱ्या रेशनिंग धारकाला कोलाड पोलिसांनी रंगेहात पकडले असून, पोलिसांनी तब्बल ५ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८.१५ वाजता कोलाड पोलीस ठाण्याचे हवालदार मारुती देव्हारे आणि पोलीस शिपाई पांचाळ हे गारभट व खरबाचीवाडी परिसरात सरकारी वाहन (क्र. एम.एच.०६ सीडी ४८९९) घेऊन गस्त घालत असताना गारभट दिशेने येणारी पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी त्यांच्या नजरेस पडली. त्या गाडीवर प्लास्टिकच्या कपड्याने झाकलेली पोती दिसल्याने पोलिसांनी ती थांबवली. गाडीतील चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय बळावला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात रेशनिंग दुकानातील गहू आणि तांदळाच्या एकूण ४१ गोण्या आढळल्या.

वाहन चालक दिपक भागोजी दंत (रा. वावळोली, ता. सुधागड) याने चौकशीत सांगितले की, हा माल गारभट येथील रेशनिंग दुकानदार शरद उर्फ नाना शिंदे यांच्या दुकानातून भरून पाली येथील ललितशेठ फुलचंद ओसवाल यांच्याकडे नेत होता. ही माहिती तत्काळ कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांना देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार पिकअप गाडी (क्र. एम.एच.०६ बीडब्ल्यू ६२८६) कोलाड पोलीस ठाण्यात आणण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक भोजकर यांनी पंचनामा करून तपास केला असता, गव्हाच्या ५० किलो वजनाच्या १६ गोण्या (एकूण ८०० किलो किंमत १६,००० रुपये) आणि तांदळाच्या ५० किलो वजनाच्या २५ गोण्या (एकूण १,२५० किलो किंमत २५,००० रुपये) असा महाराष्ट्र शासनाचा लोगो असलेला ४१ हजार रुपयांचा माल आढळून आला. तसेच ५ लाख रुपयांची पिकअप गाडी मिळून एकूण ५ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपी दिपक भागोजी दंत, शरद उर्फ नाना शंकर शिंदे (रा. चिंचवली तर्फे अतोणे खालचा गारभट, ता. रोहा), ललितशेठ फुलचंद ओसवाल (रा. पाली), हनुमंत शिंदे आणि रुपेश यांनी एकमेकांच्या संगनमताने शासनाने जनतेसाठी दिलेले रेशनिंग धान्य जनतेला वाटप न करता स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरित्या वाहतूक करून काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोजकर हे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!