श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली गावातील नागाव मोहल्ला परिसरात शासनाने प्रतिबंध केलेल्या गोवंश जातीच्या जनावराची कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
घटना ३ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बिलाल उस्मान शेख (वय ३१, रा. नागाव मोहल्ला, बोर्ली पचतन), नाविद मोहम्मद हसवारे (वय २९, रा. नागाव मोहल्ला, बोर्ली पचतन) आणि सुलतान हसनखान पठाण (वय ४२, रा. पांगळोली, ता. म्हसळा) यांनी स्वतःच्या फायद्यासाठी गोवंश जातीच्या काळ्या रंगाच्या जनावराची कत्तल करून त्याचे मांस ताब्यात ठेवल्याची माहिती मिळाली.
या प्रकारामुळे शासनाच्या प्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाल्याने दिघी सागरी पोलिसांनी वरील तिघांविरुद्ध गुन्हा क्रमांक ६८/२०२५ नोंदवला आहे. आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम ३२५(३)(५) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(क) आणि ९(१)(अ) नुसार कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपी नाविद मोहम्मद हसवारे याच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हा क्रमांक ४१/२०२३ अंतर्गत भा.द.वि. कलम ३४ सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंद असल्याचे समजते.
या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अर्शद शेख करीत असून, घटनास्थळाची पाहणी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांनी केली आहे. या प्रकरणाची फिर्याद पोलीस नाईक अनिल हरी कुंथे (बकल क्र. २३०९, दिघी सागरी पोलीस ठाणे) यांनी दिली आहे.
