• Wed. Dec 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

साची बेलोसे बनली रायगडची पहिली एमसीए स्टेट पॅनल महिला पंच

ByEditor

Oct 7, 2025


साची बेलोसेच्या यशाने रायगड क्रिकेट जगताचा अभिमान वाढवला!

अलिबाग | क्रीडा प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. खारघर येथील उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू कु. साची सुधीर बेलोसे हिने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) तर्फे घेण्यात आलेल्या स्टेट पॅनल पंच परीक्षेत उत्तीर्ण होत रायगड जिल्ह्यातील पहिली महिला पंच होण्याचा मान पटकावला आहे.

साची बेलोसे हिला या प्रतिष्ठित परीक्षेत ८२ टक्के गुण मिळाले असून, प्रॅक्टिकल परीक्षेत तिने २० पैकी २० गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. एमसीएच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या निकालात ती संपूर्ण कोकण विभागातील एकमेव महिला उमेदवार ठरली आहे.

साची बेलोसे ही एक कुशल क्रिकेटपटू असून, तिने रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या १५, १९, २३ आणि वरिष्ठ महिलांच्या संघात यशस्वीरीत्या खेळ केले आहेत. पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर व्यक्त केलेल्या भावना व्यक्त करताना ती म्हणाली —

“महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने महिलांसाठी पंच परीक्षा आयोजित करून महिला पंचांना संधी उपलब्ध करून दिली, याबद्दल मी एमसीएचे मनःपूर्वक आभार मानते. तसेच आरडीसीएने जिल्ह्यात पंचांसाठी घेतलेले १०० दिवसांचे प्रशिक्षण शिबिर मला मोठं व्यासपीठ ठरलं.”

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (आरडीसीए) वतीने १०० दिवसांचे पंच प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी क्रिकेट नियम तज्ञ नयन कट्टा, बीसीसीआय पंच व माजी रणजी खेळाडू हर्षद रावले, तसेच एमसीए (मुंबई) पंच राजन कसबे यांनी मौल्यवान मार्गदर्शन दिले.

साची बेलोसेच्या या यशानंतर आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, उपाध्यक्ष यशवंत साबळे, सचिव प्रदीप नाईक, सहसचिव जयंत नाईक, कोषाध्यक्ष प्रशांत ओक, तसेच कार्यकारिणी सदस्य अॅड. पंकज पंडित, समीर मसुरकर, प्रदीप खलाटे, कौस्तुभ जोशी, मुख्य प्रशिक्षक शंकर दळवी आदींनी तिचा सत्कार करून अभिनंदन केला.

या यशाबद्दल बोलताना अध्यक्ष अनिरुद्ध पाटील म्हणाले —

“गेल्या एका वर्षात रायगड जिल्ह्यातील १२ पंचांनी एमसीए पंच पॅनेलसाठी पात्रता मिळवली असून, ११ अधिकृत स्कोअरर्स कार्यरत आहेत. हे आरडीसीएचे मोठे यश आहे. रायगडमध्ये क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी कुशल पंच आणि स्कोअरर्स तयार करणे गरजेचे आहे, आणि आम्ही त्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.”

रायगड जिल्ह्यातील मुला-मुलींची महाराष्ट्र संघात निवड होत असल्याबरोबरच आता महिला पंच आणि स्कोअरर्स देखील एमसीएमध्ये कार्यरत होत असल्याचा अभिमान असल्याचेही त्यांनी नमूद केले.

साची बेलोसेच्या या उल्लेखनीय यशानंतर तिला संपूर्ण रायगड जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, तिच्या या यशाने रायगडच्या महिला क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!