नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांना उपस्थित राहण्याचे तहसीलदार साचिन खाडे यांचे आवाहन
म्हसळा । वैभव कळस
आगामी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हसळा पंचायत समितीच्या चार गणांच्या आरक्षणासाठीची सोडत येत्या १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात काढण्यात येणार आहे.
ही विशेष सभा तहसीलदार साचिन खाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून, तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार खाडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम, २०२५ नुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती क्षेत्रांतील जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय नागरिक आणि महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत पद्धतीने ही कार्यवाही केली जाणार आहे, असेही खाडे यांनी सांगितले.
