• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पोलिस हवालदार ३ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अडकला

ByEditor

Oct 10, 2025

पॉक्सो प्रकरणात कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ५ लाखांची मागणी

रायगड अँटी करप्शन ब्युरोची यशस्वी सापळा कारवाई

अलिबाग | अमुलकुमार जैन
पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत कारवाई न करण्यासाठी आणि मदतीच्या मोबदल्यात तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराला रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. आरोपी विशाल वाघाटे (पो.ह. क्र. ९६१) याने पहिल्या हप्त्यापोटी ३ लाख रुपये स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोच्या सापळ्यात अडकला.

ही कारवाई १० ऑक्टोबर २०२५ रोजी सव्वा बारा वाजता, महाड शहरात पार पडली. आरोपी वाघाटे हा पोलीस मुख्यालय, अलिबाग येथे कार्यरत होता.

तक्रार, पडताळणी आणि अटकेची नाट्यमय कारवाई

३० वर्षीय तक्रारदाराने ८ ऑक्टोबर रोजी रायगड अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये आरोपीने तक्रारदाराकडे ५ लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. या रकमेतून ३ लाख रुपये प्रथम हप्त्यापोटी स्वीकारण्याचे ठरवण्यात आले.

अखेर १० ऑक्टोबरला, महाड शहरातील ठरलेल्या ठिकाणी तक्रारदाराकडून ३ लाख रुपये स्वीकारताना, विशाल वाघाटे याला अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी महाड शहर पोलीस ठाण्यात प्रक्रिया सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
सापळा पथकामध्ये पो.नि. निशांत धनवडे, पो.नि. नारायण सरोदे, सहा. फौजदार विनोद जाधव, सहा. फौजदार अरुण करकरे, सहा. फौजदार सुषमा राऊळ व इतर कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग होता.

या पथकाला अँटी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे, आणि सुहास शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

📞 नागरिकांना अँटी करप्शनचे आवाहन

रायगड अँटी करप्शन ब्युरोकडून नागरिकांना स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे की, “कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी, किंवा त्यांच्या वतीने कोणीही, शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काशिवाय अतिरिक्त पैसे मागत असल्यास, खालील क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा:”
दूरध्वनी: 02141-222331

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!