• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भाऊचा धक्का–रेवस प्रवासी बोटसेवा आजपासून पुन्हा सुरू

ByEditor

Oct 10, 2025

साडेचार महिन्यांनंतर सागरी मार्ग खुला; पर्यटक व प्रवाशांना दिलासा

अलिबाग │ प्रतिनिधी
पावसाळी हंगामामुळे बंद असलेली भाऊचा धक्का ते रेवस प्रवासी बोटसेवा अखेर शुक्रवार, १० ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. सकाळी साडेसहा वाजता पहिली बोट भाऊचा धक्का येथून सुटणार असून, दुपारी ४ वाजेपर्यंत शेवटची फेरी होणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेने दिली.

साडेचार महिन्यांनंतर ही सागरी मार्गावरील सेवा पुन्हा सुरू होत असल्याने अलिबाग–मुंबई मार्गावरील प्रवासी आणि कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव सेवा बंद

पावसाळी हंगामात समुद्रात तीव्र वारे, उंच लाटा आणि मुसळधार पाऊस यामुळे भाऊचा धक्का–रेवस, मोरा–भाऊचा धक्का आणि गेटवे–मांडवा अशा प्रमुख मार्गांवरील बोटसेवा खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आल्या होत्या.
दरवर्षी पावसाळ्यात जलवाहतूक संस्था ही सेवा बंद करते. यातील मोरा–भाऊचा धक्का आणि गेटवे–मांडवा सेवा दोन महिन्यांपूर्वीच पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भाऊचा धक्का–रेवस मार्ग बंद ठेवण्यात आला होता, अशी माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सचिव शराफत मुकादम यांनी दिली.

हवामानानुसार वेळापत्रकात बदल

संस्थेच्या म्हणण्यानुसार, परतीच्या पावसामुळे हवामानात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता अद्याप आहे. त्यामुळे चक्रीवादळ किंवा वादळी परिस्थिती निर्माण झाल्यास प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बोटसेवेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येऊ शकतात.

दरम्यान, या मार्गावरील सेवा पुन्हा सुरू झाल्याने दररोज प्रवास करणारे कामगार, विद्यार्थी आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई–अलिबाग सागरी मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू होणार असल्याने किनारी भागातील आर्थिक आणि पर्यटन हालचालींनाही गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

By Editor

One thought on “भाऊचा धक्का–रेवस प्रवासी बोटसेवा आजपासून पुन्हा सुरू”
  1. When online booking service will start for ferry warf to revas boat service. And also make a proper website include time table.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!