पेण | विनायक पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रसाद भोईर यांची उत्तर रायगड जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना मध्य रायगड जिल्ह्याबरोबरच उत्तर रायगडची अतिरिक्त जबाबदारीही सोपविण्यात आली आहे.
शिवसेनेतील जिल्हा संपर्कप्रमुख हे अत्यंत प्रभावशाली पद मानले जाते. पक्षप्रमुखांशी थेट संवाद असलेल्या या पदावर मातोश्रीच्या विश्वासातील आणि संघटनात्मक कामगिरीतून सिद्ध झालेल्या नेत्यांची निवड केली जाते. साधारणतः दोन विधानसभा क्षेत्रांपुरती ही जबाबदारी असते, मात्र प्रसाद भोईर यांच्याकडे पेण, पनवेल, कर्जत, उरण आणि अलिबाग अशा पाच विधानसभा क्षेत्रांची जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांच्या नेतृत्वावर पक्षश्रेष्ठींचा विशेष विश्वास असल्याचे बोलले जात आहे.
तरुण, तडफदार आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या प्रसाद भोईर यांनी अल्पावधीतच संघटनात्मक कामात आपली छाप सोडली आहे. त्यांचे परिपक्व नेतृत्व, प्रशासकीय जाण, तसेच कामगार आणि उद्योग क्षेत्रातील अभ्यास यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आणि वरिष्ठ नेत्यांचा विश्वास त्यांनी संपादन केला आहे.
कोकण हे शिवसेनेचे पारंपरिक बालेकिल्ले मानले जाते. मात्र अलीकडील राजकीय घडामोडींनंतर संघटना अधिक मजबूत करण्याची गरज भासू लागली होती. त्यातच कोकणाचे प्रवेशद्वार असलेल्या रायगड जिल्ह्यात प्रसाद भोईर यांच्यासारख्या ऊर्जावान नेतृत्वाला जबाबदारी देऊन पक्षाने कोकणातील संघटनात्मक पुनरुज्जीवनाचा स्पष्ट संदेश दिला आहे.
‘तिसरी मुंबई’ आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासाच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक मराठी आणि भूमिपुत्रांच्या न्यायहक्कांसाठी झगडणाऱ्या संघटनेचा आवाज आणखी बुलंद करण्यासाठी शिवसेना आता रायगड जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे.
संपूर्ण रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक आणि नागरिकांमधून प्रसाद भोईर यांच्या या नियुक्तीचे उत्स्फूर्त स्वागत व अभिनंदन होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील शिवसेना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
