• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धनमध्ये दिवाळीत महसूलच दिवाळं!

ByEditor

Oct 20, 2025

परवानगी पन्नासची उत्खनन हजार ब्रासचे

अधिकारी भुमाफियांच्या दावणीला

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यात बेकायदा गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा माती उत्खनन केल्याचे दिसते. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसते. गंभीर बाब म्हणजे नाममात्र स्वामित्वधन म्हणजेच रॉयल्टी त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट उत्खनन केले जात आहे. यामुळे सरकारचे काही कोटींचा महसूल बुडत आहे. बोर्लीपंचतन परिसरात खुजारे येथून खाजगी व्यावसायिकांकडून भरमसाठ उत्खनन करून वाहतूक केली जातेय.

गौण खनिज उत्खननात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा आहे. या माती उत्खननाचे महसूल कार्यालयातून रॉयल्टी चलन काढले जाते. मात्र, चलनावर किती ब्रास माती उत्खनन करणार आहे, याची नोंद नसून केवळ रक्‍कमच दाखवली जाते. यातून सरकारचा महसूल बुडतो तर उत्खनन करणाऱ्यांकडून काही अधिकाऱ्यांची खिसे भरले जातात, असा आरोप ग्रामस्‍थ करत आहेत.

तालुक्यात विविध गावात जमिनीतील माती, मुरूम काढण्याची शासनाने परवानगी दिली आहे. शासनाला रॉयल्टी कमी भरायची आणि हजारो ब्रास माती, मुरूम उचलायचा त्यातून बक्कळ पैसा कमवायचा, असा व्यवसाय धंदा सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील, डोंगरांचे नैसर्गिक सौंदर्य महसूल विभागाच्या नाकर्तेपणामुळे संपुष्टात येत आहे.

दर पावसाळी भूस्खलनाचा धोका

श्रीवर्धन तालुक्यात कोट्यवधी ची उलाढाल होत असून, पुणे – मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या श्रीवर्धन तालुक्‍यामध्ये मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्‍प, रिसॉर्ट उभारले जात आहेत. त्यासाठी डोंगर पोखरण्यात येत आहेत. डोंगर पोखरताना कुठलेही नियम पाळले जात नसल्याने भूस्खलनासारखी दुर्घटना घडू शकते, याकडे लक्ष वेधण्यात येते.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

प्रांताधिकारी किंवा तहसीलदार यांनी उत्खनन व भराव टाकण्यास परवानगी दिली असताना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मंडलाधिकारी तसेच तलाठी यांचीही असते मात्र स्थनिक पातळीवर अशा बेकायदा उत्तखनन कडे दुर्लक्ष केले जाते. अधिक माहितीसाठी संपर्क साधला असता नॉट रिचेबल हेच ऐकायला मिळते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!