• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर ते कशेडी दरम्यान नऊ महिन्यात ३६ मृत्युमुखी!

ByEditor

Oct 27, 2025

चौपदरीकरण झालं तरीही अपघातांची मालिका कायम

महाड | मिलिंद माने

कोकणात जाणारा एकमेव प्रमुख मार्ग असलेला मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ आजही अपघातांचा ‘डेथ ट्रॅप’ ठरत आहे. मागील नऊ महिन्यांत (जानेवारी ते सप्टेंबर २०२५) इंदापूर ते कशेडी बोगदा या सुमारे ७० किमी पट्ट्यात तब्बल ६९ अपघातांमध्ये ३६ जणांचा मृत्यू, तर ७९ जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक माहिती महामार्ग पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे यांनी दिली आहे.

चौपदरीकरण झालं असलं तरी अपघातांची मालिका थांबलेली नाही, अशी कटू वस्तुस्थिती समोर येत आहे. कोकणवासीय, चाकरमानी व प्रवासी दररोज जीव मुठीत धरून प्रवास करत असल्याचे चित्र कायम आहे.

१८ वर्षांपासून रखडलेलं चौपदरीकरण

मुंबई–गोवा महामार्गाचं चौपदरीकरण गेल्या १८ वर्षांपासून रखडलेलं आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दरवर्षी “काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल” असा दावा करत असले तरी प्रत्यक्षात कामाचा वेग अतिशय मंद आहे.
या कामाला अजून किमान दोन वर्षांचा कालावधी लागेल, असा अंदाज दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या एस.टी. प्रवासी व खाजगी वाहनचालकांनी व्यक्त केला. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

नऊ महिन्यांतील अपघातांचा अहवाल

इंदापूर ते कशेडी बोगदा या ७० किमीच्या पट्ट्यात —

  • एकूण अपघात : ६९
  • मृत्युमुखी : ३६ प्रवासी
  • गंभीर जखमी : ७९ प्रवासी
  • मध्यम जखमी : २८ प्रवासी
  • किरकोळ जखमी : ४२ प्रवासी

वाहतूक नियमभंगांवर ७५ लाखांचा दंड

या कालावधीत महामार्ग पोलिसांनी ६,१५४ वाहनचालकांवर कारवाई केली आहे.
सीट बेल्ट न लावणे, वेगमर्यादेचा भंग, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी व मालवाहतूक यांसारख्या उल्लंघनांवर एकूण ₹७४,९८,४५० इतका दंड आकारण्यात आला.
त्यापैकी ₹५,५६,४५० इतकी रक्कम वसूल झाली असून, ₹६९,४२० रक्कम अद्याप थकबाकीत आहे, अशी माहिती उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे यांनी दिली.

सुरक्षिततेचा प्रश्न अद्यापही अनुत्तरित

मुंबई–गोवा महामार्गावर दररोज वाढणारी वाहतूक, अपूर्ण चौपदरीकरण, बोगद्यांमधील अपुरी प्रकाशयोजना, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन — या सर्व घटकांमुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच आहे.
स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या महामार्गावर तातडीने सुरक्षा उपाय वाढवण्याची मागणी केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!