पर्यटकांचा खोळंबा; “हा तिढा केव्हा सुटणार?” — संतप्त प्रवाशांचा सवाल
कोलाड : विश्वास निकम
दिवाळी सुट्टीसह सलग शनिवार-रविवार सुट्टीचा लाभ घेऊन कोकणात आलेल्या हजारो पर्यटकांचा परतीचा प्रवास रविवारी रात्री मोठ्या त्रासदायक ठरला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड ते खांबदरम्यानच्या अपूर्ण रस्त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी प्रवाश्यांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले.
दिवाळी सुट्टीचा आनंद लुटल्यानंतर मुंबई, ठाणे, पुणे तसेच इतर राज्यांतील पर्यटक कोकणातील समुद्रकिनारे, गडकिल्ले आणि निसर्गसौंदर्य अनुभवून परतीच्या प्रवासाला निघाले होते. मात्र, महामार्गावरील अपूर्ण कामे आणि खड्डेमय रस्ते यामुळे त्यांचा प्रवास अक्षरशः थांबला. एसटी बस, खाजगी बस, चारचाकी वाहने आणि दुचाक्यांच्या रांगा अनेक किलोमीटरपर्यंत पसरल्या होत्या.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे चौपदरीकरणाचे काम तब्बल १८ वर्षांपासून सुरू आहे; तरीही ते अद्याप पूर्ण झालेले नाही. निवडणुकीपूर्वी जोरात सुरू झालेले काम मतदानानंतर पुन्हा मंदावले असून, सध्या ठिकठिकाणी केवळ काही मजुरांवरच कामाचा भार आहे. त्यामुळे “हे काम नेमके केव्हा पूर्ण होणार?” असा प्रश्न प्रवाश्यांतून उपस्थित होत आहे.
रविवारी रात्री कोलाड, खांब, माणगाव आणि इंदापूर परिसरात ३ ते ४ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी होती. त्यातच परतीच्या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचले, ज्यामुळे वाहनांची गती आणखी मंदावली. वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस यंत्रणा प्रयत्नशील असली, तरी परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे कठीण ठरत होते.
वाहतूक कोंडीत अडकलेल्या संतप्त प्रवाश्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत “दरवर्षी दिवाळीनंतर हीच परिस्थिती निर्माण होते, पण कोणीही कायमस्वरूपी उपाय करत नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया दिली.
