महाडमध्ये बोलेरो जीपसह अनधिकृत खैर जप्त — वन विभागाच्या निष्क्रियतेची चर्चा
महाड : मिलिंद माने
महाड तालुक्यात खैर वृक्षांच्या अनधिकृत तोडीचा आणि तस्करीचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. वन विभागाने दुर्लक्ष केल्याने पोलिसांनीच खैराची अवैध वाहतूक करणारी जीप पकडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणानंतर “वनखाते सुस्तावले, पोलिस सक्रिय झाले!” अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.
महाड तालुक्यात खेडोपाडी मोठ्या प्रमाणावर खैराच्या झाडांची तोड चालू असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. रात्रीच्या अंधारात अनधिकृतरीत्या लाकूड वाहतूक केली जात असून, वन विभाग मात्र कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याची नाराजी नागरिकांतून व्यक्त होत आहे.
नाकाबंदीमध्ये सापडली बोलेरो जीप
महाड शहराजवळील शिरगाव तपासणी नाक्यावर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री नाकाबंदी दरम्यान एम.एच.१२ एफ.डी. ५९०३ क्रमांकाची महिंद्रा बोलेरो जीप संशयास्पदरीत्या जाताना थांबवली. तपासात वाहनात खैराचे १९६ नग (१.७९२ घनमीटर) लाकूड आढळले, ज्याची किंमत रु. २७,४०३ इतकी आहे. त्यासह वाहनाची किंमत रु. ३.५० लाख असल्याने पोलिसांनी एकूण रु. ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी वाहन आणि लाकूड वन विभागाच्या ताब्यात दिले असून, या प्रकरणी आकाश पुंडलिक पडळघरे आणि देविदास शिवाजी पडळघरे (दोघेही रा. रिहे पडळघरेवाडी, ता. मुळशी, जि. पुणे) यांच्याविरोधात भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम ४१(२)(ब) व ४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
महाड तालुक्यात गेल्या काही महिन्यांत खैर वृक्षतोडीचे प्रकार वाढले असून, यावर नियंत्रण ठेवणे हे वन विभागाचे मूलभूत कर्तव्य आहे. मात्र पोलिसांनी कारवाई केल्याने विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिकांकडून असा आरोप केला जात आहे की, “वनखात्याला जंगलात काय सुरू आहे याची कल्पनाच नसते. खैराची तस्करी मोठ्या प्रमाणात चालू असून, अधिकारी मात्र कार्यालयात बसूनच तपास पूर्ण मानतात.”
या घटनेनंतर वन विभागाने तत्काळ गस्ती वाढवून खैर तोडीच्या प्रकरणांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि पर्यावरणप्रेमी करत आहेत.
