अलिबाग | सचिन पावशे
एआय युगातील सायबर क्राईम आणि त्यावरील कायदेशीर उपाययोजनांविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड – अलिबाग आणि जिल्हा न्यायालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सायबर कायदा तज्ञ अॅड. प्रशांत माळी (बॉम्बे हायकोर्ट) यांनी “एआय युगातील सायबर क्राईम आणि सायबर कायदे” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
अॅड. माळी यांनी आपल्या भाषणात सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, त्यांचे सामाजिक-आर्थिक परिणाम तसेच डिजिटल सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी याबाबत उपस्थितांना माहिती दिली. त्यांनी सायबर तंत्रज्ञानाचे फायदे जसे की जलद संवाद, डिजिटल व्यवहार, माहितीची देवाणघेवाण यांबरोबरच त्यातील तोटे – डेटा चोरी, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया गैरवापर, बनावट ओळख निर्मिती – यांवरही प्रकाश टाकला. तसेच नागरिकांना सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदविण्यासाठी 1930 या राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड – अलिबाग श्री. राजेंद्र द. सावंत हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश (एक) श्रीमती सृष्टी नीलकंठ, जिल्हा न्यायाधीश (3) एस. डी. भगत, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. बी. अत्तार आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश दि. बी. बी. गवारे उपस्थित होते.
श्रीमती सृष्टी नीलकंठ, जिल्हा न्यायाधीश (एक) यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी म्हटले की, “डिजिटल युगात प्रत्येकाने तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करणे अत्यावश्यक आहे. जागरूक नागरिक बनल्यास सायबर गुन्ह्यांपासून बचाव शक्य आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी केले, तर सूत्रसंचालन अॅड. अमित देशमुख (सचिव – वकील संघटना, अलिबाग) यांनी केले. अॅड. प्रसाद पाटील (अध्यक्ष – वकील संघटना, अलिबाग) यांनी सायबर कायद्याविषयी जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एलईडीसीएस प्रमुख श्री. चंद्रशेखर कामथे यांनी केले. या कार्यक्रमास वकील व न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती निर्माण करणारा हा उपक्रम सर्वांच्या प्रशंसेस पात्र ठरला.
