• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये गॅस माफियांचा पर्दाफाश! पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; लाखोंचा मुद्देमाल जप्त

ByEditor

Oct 29, 2025

घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरमधून गॅस चोरी; चार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद

उरण । घन:श्याम कडू
उरण तालुक्यात गॅस सिलेंडरच्या नावाखाली सुरू असलेला बेकायदेशीर गॅस विक्रीचा धंदा अखेर पोलिसांच्या सापळ्यात अडकला आहे. घरगुती व व्यावसायिक सिलेंडरमधील गॅस अवैधरित्या काढून त्याची काळाबाजारी करणाऱ्या रॅकेटवर उरण पोलिसांनी पुरवठा विभागाच्या मदतीने धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल ₹24 लाख 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून तिघांना अटक करण्यात आली आहे.

द्रोणागिरी सेक्टर 50 परिसरात उरण पोलिस आणि पुरवठा निरीक्षण विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली. जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे उघड उल्लंघन करून हे रॅकेट भारत गॅसच्या व्यावसायिक सिलेंडरमधील गॅस एका लोखंडी पाईपच्या साहाय्याने घरगुती सिलेंडरमध्ये भरत होते. नंतर हे सिलेंडर बेकायदेशीरपणे विकून आरोपी मोठ्या प्रमाणावर नफा कमवत होते.

प्रभारी पुरवठा निरीक्षक प्रभाकर पद्माकर नवाळे यांनी या प्रकरणी लेखी तक्रार दिल्यानंतर उरण पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी भारत गॅसचे 277 व्यावसायिक सिलेंडर, एचपी कंपनीचे 5 किलो वजनाचे 60 भरलेले आणि 8 रिकामे घरगुती सिलेंडर, तसेच एक टाटा टेम्पो (मॉडेल 1112), दोन बोलेरो जीप आणि गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी पाईप असा मोठा माल जप्त केला.

या प्रकरणी पोलिसांनी बालाजी धोंडीबा साळवी (40), मनोहर गणेश गोंड (36) आणि सुरेशकुमार सखाराम माजरा (30) या तिघांना घटनास्थळीच अटक केली आहे. चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे. सर्व आरोपींविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक स्मिता अशोक पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

या कारवाईनंतर उरण तालुक्यातील बेकायदेशीर गॅस व्यापार करणाऱ्या माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांच्या सुरक्षेशी खेळणारा आणि जीवघेणा ठरू शकणारा हा काळाबाजारीचा प्रकार उघडकीस आणल्याबद्दल उरण पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर अवैध धंद्याचा तपास आमच्या प्रतिनिधींनी काही दिवसांपूर्वी उघड केला होता. त्यानंतरच पोलिसांनी कारवाईची चक्रे फिरवून गॅस माफियांवर सर्जिकल स्ट्राईक केला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!