९७६ गावांतील २,८०७ हेक्टर क्षेत्र बाधित; ८,७१६ शेतकऱ्यांवर उपजीविकेचे संकट
महाड । मिलिंद माने
कोकणात यंदाच्या पावसाळ्याने सहा महिने पूर्ण होत असतानाही पावसाचा जोर कमी होण्याचे नाव घेत नाही. मागील पंधरवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, १५ तालुक्यांतील ९७६ गावांमधील तब्बल २,८०७.५२ हेक्टर क्षेत्रावरील भात शेती बाधित झाल्याचे कृषी विभागाच्या पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे.
कृषी व महसूल विभागामार्फत नुकतेच करण्यात आलेल्या प्राथमिक पंचनाम्यात ८,७१६ शेतकरी बाधित झाल्याची नोंद आहे. पावसाने तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शासनाने पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली असली तरी नुकसानभरपाई कधी आणि किती मिळणार, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.
जिल्हाभर शेतीचे मोठे नुकसान
रायगड जिल्हा हा “कोकणचे कोठार” म्हणून ओळखला जातो. मात्र यंदाच्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. भाताबरोबरच नाचणी आणि वरी या पिकांनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. सततचा पाऊस, ओल्या जमिनीमुळे पिके कुजून गेली असून शेतकऱ्यांचा वर्षभराचा श्रम आणि खर्च पाण्यात गेला आहे.
तालुकानिहाय नुकसानाचे चित्र
कृषी विभागाने १ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या पावसाचा अहवाल जाहीर केला असून त्यानुसार –
| तालुका | बाधित गावांची संख्या | बाधित शेतकरी | बाधित क्षेत्र (हे.) |
|---|---|---|---|
| अलिबाग | ५६ | २२० | ८४.३२ |
| पेण | ४५ | १,७५० | ७५०.०० |
| मुरुड | ४४ | ३१४ | ८२.९२ |
| खालापूर | ७३ | ३३९ | ७३.४४ |
| कर्जत | २०८ | ४५१ | १७१.८६ |
| पनवेल | ४६ | ११८ | ३६.४० |
| उरण | २३ | १७१ | ४३.७६ |
| माणगाव | ५३ | ४११ | १२५.६७ |
| तळा | १५ | ९९ | १८.०० |
| रोहा | १२० | २,७०० | ९५०.०० |
| सुधागड-पाळी | ४६ | ३१६ | १२५.३५ |
| महाड | ७४ | ६१५ | १५८.१५ |
| पोलादपूर | ८८ | १३८ | १२७.०० |
| म्हसळा | ५४ | १६८ | ३९.०० |
| श्रीवर्धन | ३१ | १०६ | २१.४५ |
एकूण: ९७६ गावे, ८,७१६ शेतकरी, २,८०७.५२ हेक्टर क्षेत्र बाधित.
शेतकऱ्यांचा आक्रोश – “ओला दुष्काळ जाहीर करा!”
अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भात शेतीचे नुकसान झाल्याने रायगडसह संपूर्ण कोकणातील शेतकरी वर्गातून शासनाकडे “ओला दुष्काळ” जाहीर करण्याची मागणी होत आहे. “नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत, कर्जमाफी आणि बियाणे अनुदान द्यावे,” अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधींचा उदासीनपणा
रायगड जिल्ह्यात सात आमदार, दोन खासदार आणि एक राज्यसभा सदस्य असून त्यातील दोन जण मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. तरीही अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेला नाही, अशी शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सत्ताधारी पक्षातील प्रतिनिधी सध्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेले असून, शेतकऱ्यांचे हाल विचारायला कोणीही पुढे येत नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
