रायगड | प्रतिनिधी
निसर्गरम्य ताम्हिणी घाट पुन्हा एकदा दुर्दैवी घटनेने हादरला आहे. दरड कोसळून कारवर मोठा दगड पडल्याने कारमधील प्रवाशांपैकी एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (गुरुवारी) दुपारच्या सुमारास कोंडीथर गावच्या हद्दीत घडली. मृत महिलेचे नाव स्नेहल गुजराथी (वय ४३, रा. पुणे) असे असून, या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहल गुजराथी या आपल्या कुटुंबासह पुण्याहून माणगावच्या दिशेने आलिशान कारमधून प्रवास करत होत्या. घाटातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी कारमधील प्रवाशांनी सनरूफ उघडली होती. मात्र, त्याचवेळी अचानक दरड कोसळली आणि त्यातील एक मोठा दगड थेट सनरूफमधून आत येत स्नेहल गुजराथी यांच्या डोक्यावर आदळला. ती जागीच कोसळल्या.
घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ तात्काळ मदतीला धावले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माणगाव पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून, मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
ताम्हिणी घाट हा सुंदर पर्यटनस्थळ असला, तरी पावसाळ्यात आणि धुक्याच्या हंगामात येथे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढते. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार घडत आहेत. पोलिसांनी प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करताना, विशेषतः घाटमाथ्यावर किंवा डोंगराळ भागात सनरूफ उघडून प्रवास करणे जीवघेणे ठरू शकते, असा इशाराही दिला आहे.
