१५ खलाशांना मृत्यूच्या जबड्यातून बाहेर खेचणारा ‘उरणचा अवलिया’!
उरण | घन:श्याम कडू
वादळाच्या तडाख्यात समुद्र खवळला होता, लाटांनी आकाश गाठले होते, आणि त्या लाटांमध्ये दोन बोटींसह १५ खलाशी मृत्यूच्या दारात अडकले होते. अशा भीषण परिस्थितीत करंजा गावातील अतिश सदानंद कोळी हा ‘देवरूप’ बनून समुद्रात उतरला आणि २४ तासांच्या थरारक झुंजीत त्या सर्वांना वाचवले!

राज्यात हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे मासेमारीस बंदी होती, तरी काही बोटी समुद्रात गेल्या आणि भरकटल्या. बोटमालक मच्छिंद्र नाखवा यांनी गावातील अतिश कोळी याच्याकडे मदत मागितली. क्षणाचाही विलंब न लावता अतिशने आपली बोट घेऊन वादळात झेप घेतली.
रात्रभर पाऊस, अंधार आणि खवळलेला समुद्र पण अतिशचा निर्धार अढळ! मोबाईलवरील गुगल अॅपच्या साहाय्याने त्याने शोधमोहीम राबवली. आठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला हरवलेल्या बोटी दिसल्या. बोटीवरील खलाशी तीन दिवसांपासून बिस्किटांवर दिवस काढत देवाची प्रार्थना करत होते. आणि त्याच क्षणी देवानेच अतिशच्या रूपाने त्यांना आधार दिला!

अतिशने एका बोटीला उरलेल्या दोन बोटी बांधल्या आणि २४ तासांच्या संघर्षानंतर १५ खलाशांना सुखरूप किनाऱ्यावर आणले. जीवावर उदार होऊन केलेल्या या थरारक पराक्रमाची अधिकृत दखल मात्र मत्स्यविभाग वा सोसायटीकडून घेतली गेली नाही, ही खंत आहे.
उरणचे जागरूक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी घटनास्थळी धाव घेत अतिशचा सत्कार केला आणि राज्य सरकारने त्याच्या या शौर्यगाथेचा गौरव करावा, अशी मागणी केली आहे.
समुद्र खवळला, बोटी भरकटल्या… पण एक अवलिया लाटांवर चालत आला आणि १५ जीव परत घेऊन गेला! तो म्हणजे उरणचा अतिश कोळी!
