मांडवा जेट्टीवरील पुलाचे खांब झाले निकामी, अनेक ठिकाणी खांबांचे सिमेंट गळून पडल्यामुळे लोखंडी सळई आल्या बाहेर
प्रवाशांचा जीव धोक्यात; महाराष्ट्र सागरी मंडळाच्या दुर्लक्षाबद्दल संताप
अलिबाग | अब्दुल सोगावकर
गेटवे ऑफ इंडिया, मुंबई ते मांडवा-अलिबाग या जलमार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी मांडवा जेट्टी हा प्रमुख दुवा आहे. मात्र या जेट्टीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून पुलाच्या खांबांवरील सिमेंट गळून पडल्यामुळे लोखंडी सळया बाहेर आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे या जेट्टीला कोणत्याही क्षणी धोका निर्माण होऊन ती कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. तरीदेखील संबंधित महाराष्ट्र सागरी मंडळ याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याने प्रवासी आणि पर्यटक संतप्त झाले आहेत.
निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुलाची दुर्दशा
मांडवा येथे महाराष्ट्र शासनाच्या मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे काही वर्षांपूर्वी आधुनिक आणि आकर्षक जेट्टी बांधण्यात आली होती. उद्घाटनही मोठ्या थाटात पार पडले. मात्र, काहीच वर्षांत पुलाच्या खांबांवरील सिमेंट गळून पडले असून सळया बाहेर आल्याचे चित्र दिसत आहे. या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे पुलाच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोणत्याही क्षणी जेट्टी कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

दररोज हजारो प्रवाशांचा प्रवास धोक्यात
गेल्या दोन महिन्यांपासून पावसाळ्यानंतर जलवाहतूक सुरू झाली आहे. गेटवे-मुंबईहून अलिबाग, मुरुड, श्रीवर्धनकडे जाणारे हजारो पर्यटक आणि प्रवासी दररोज या मार्गाचा वापर करतात. वेळ आणि इंधनाची बचत, तसेच आरामदायी प्रवास यामुळे हा मार्ग लोकप्रिय झाला आहे. मात्र जेट्टीच्या खराब अवस्थेमुळे प्रवाशांचा जीव अक्षरशः धोक्यात आला आहे.
शेडची दुरवस्था आणि गैरसोयींचा डोंगर
जेट्टीवरील शेडची पत्रे गंजल्यामुळे ती काढण्यात आली आहेत, तर नवीन पत्रे बसविण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. परिणामी पावसाळ्यात प्रवाशांना भिजत उभे राहावे लागते, तर उन्हाळ्यात उन्हाचा त्रास सहन करावा लागतो.याशिवाय जेट्टी ते वाहनतळ या दरम्यान दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर व स्तनदा माता आणि आजारी रुग्णांसाठी असलेल्या वाहनांची संख्या केवळ एक ते दोन असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मूलभूत सुविधा ठप्प
जेट्टीवर मोफत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे प्रवाशांना विकतचे पाणी खरेदी करून अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. तसेच शौचालयांची कोणतीही सोय नसल्याने महिला प्रवाशांसह सर्वांनाच मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.दिव्यांग आणि आजारी रुग्णांसाठी व्हीलचेअरची सुविधा नसल्याने बोटीत चढ-उतार करताना त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच बसण्यासाठी जागा नसल्याने गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना उभे राहून प्रतीक्षा करावी लागत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष आणि प्रवाशांचा आक्रोश
जेट्टीवर मंत्री, आमदार, खासदार आणि प्रतिष्ठित व्यक्तींना घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चारचाकी वाहने ये-जा करत असल्याने जेट्टीच्या स्थैर्यावर अधिकच धोका निर्माण होत आहे. त्यामुळे जेट्टीवर वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.स्थानिक नागरिक, प्रवासी आणि पर्यटकांनी महाराष्ट्र सागरी मंडळाचे लक्ष वेधून घेत तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा जेट्टी कोसळून प्रवासी वाहतूक ठप्प होण्याची आणि मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रवाशांची अपेक्षा — “तातडीने उपाययोजना करा!”
मांडवा जेट्टी ही रायगड जिल्ह्याचे पर्यटनद्वार मानली जाते. त्यामुळे येथे सुरक्षित, सुसज्ज आणि सोयीस्कर व्यवस्था असणे अत्यावश्यक आहे. मात्र सध्याची दुर्दशा पाहता प्रवाशांनी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि स्थानिक प्रशासनाला इशारा दिला आहे —“आता तरी जागे व्हा, अन्यथा दुर्घटनेची जबाबदारी प्रशासनावरच असेल!”
मांडवा जेट्टीवरील सदर असुविधांबाबतीत प्रतिक्रिया घेण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, मांडवा जेट्टीवरील प्रवासी जेट्टीचे आयआयटी मुंबई यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यासंबंधी शासनाकडे दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविले आहे, ते काम टेंडर काढून लवकरात लवकर करणार आहोत. तसेच जेट्टीवरील पत्र्यांच्या शेडचे काम रेमंड कंपनी करत असून त्यांना काम करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे व ते काम पाऊस असल्याने संथगतीने सुरू करण्यात आले. यासोबतच इतर असुविधांचा विचार करून पाठपुरावा केला जात आहे.
– प्रविण पाटील
महाराष्ट्र सागरी मंडळ अधिकारी
