मनसेकडून अटकेची मागणी, १० नोव्हेंबरला ‘महाड बंद’चा इशारा
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
महाड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या मारहाण प्रकरणात नवे वळण आले आहे. या घटनेचा मुख्य सूत्रधार राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचा पुत्र विकास गोगावले असल्याचा आरोप करत, त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे. मनसेचे दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप विजय सांगळे यांनी यासंदर्भात महाड शहर पोलीस निरीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, या प्रकरणात विकास गोगावले याचे नाव गुन्ह्यात समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मंत्र्यांवर टीकेनंतर मनसे अध्यक्षावर हल्ला
राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी मंत्री गोगावले यांच्यावर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबर रोजी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून उमासरे यांच्यावर हल्ला झाला. या प्रकरणात शिंदे गटाच्या महाड पंचायत समितीच्या माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, हल्ल्याला आठ दिवस उलटूनही आरोपींना अद्याप अटक न झाल्याने मनसेकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मनसे नेते अविनाश जाधव, स्थानिक कार्यकर्ते आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांचे कार्यकर्ते यांनी ४ नोव्हेंबर रोजी महाड शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलीस निरीक्षक रमेश तडवी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांना याबाबत जाब विचारला.
या वेळी त्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. तसेच ८ नोव्हेंबरपर्यंत अटक न झाल्यास १० नोव्हेंबर रोजी ‘महाड बंद’ चा इशारा दिला आहे.
“हा पूर्वनियोजित कट” – मनसेचा आरोप
मनसेचे जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप सांगळे यांनी आपल्या लेखी पत्रात म्हटले आहे की, “महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कट आहे. या कटाचा सूत्रधार विकास भरत गोगावले असून, त्याच्यावर बी.एन.एस. कलम १०९, ११८(२) आणि ३३३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा.”
त्यांनी हे पत्र महाड शहर पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांना दिले असून, त्याची प्रत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, महाड यांनाही पाठविण्यात आली आहे.
महाड बंदचा इशारा
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने ८ नोव्हेंबरपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास १० नोव्हेंबर रोजी महाड बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.
महाड शहरातील व्यापाऱ्यांनाही या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मनसेने केले असून, या बंदसाठी मुंबई आणि ठाण्यातून मोठ्या संख्येने मनसैनिक महाडमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिले आहेत.
या संपूर्ण प्रकरणात पोलीस प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार आणि विकास गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल होणार का, याकडे महाड तसेच राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
