• Sun. Dec 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिंदेचे 35 आमदार भाजपात जाणार? खळबळ उडवणारा दावा

ByEditor

Nov 22, 2025

मुंबई : राज्यातील सत्ताधारी महायुतीतील नाराजीचा धुरळा पुन्हा उडाला असून, यावर सामनातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील तणावावर भाष्य करताना अग्रलेखात म्हटले आहे की, भाजपला एकनाथ शिंदे नकोसे झाले आहेत आणि त्यांना ‘जागा दाखवण्याचा’ लोटस कार्यक्रम सुरू झाला आहे.

अग्रलेखानुसार, शिंदे यांनी शिवसेना फोडताना जी तलवार उपसली, त्याच तलवारीने आता त्यांचाच घात होत आहे. शिंदे गटातील किमान ३५ आमदार भाजपात जाणार असल्याचा दावाही सामनाने केला आहे.

अमित शहांचे हसू आणि शिंदे यांच्यावर टीका

शिंदे गटाने भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्यावर मोठी रक्कम देऊन त्यांची माणसे फोडल्याचा आरोप केला होता. मात्र या तक्रारीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हसू आवरू शकले नाहीत, अशी खिल्ली उडवत सामनाने लिहिले आहे, “जे शिंदे स्वतःच फुटले, त्यांनी माणसे फोडण्याची तक्रार करणे हा मोठा विनोद आहे.”

महायुतीतील ‘नाराजी नाट्याचा तिसरा अंक’

अग्रलेखात म्हटले आहे की, राज्यातील सत्ताधाऱ्यांमधील नाराजीचे नाट्य अजून संपलेले नाही. आता त्याचा तिसरा अंक सुरू झाला असून हा अंक संपवणारी घंटा वाजायला लागली आहे. “नाराज शिंदेंना भाजप कवडीची किंमतही द्यायला तयार नाही. हे महानाट्य कोसळणार हे नक्की आहे.”

भाजपची रणनीती बदलली?

अग्रलेखात भाजपवर थेट आरोप करत म्हटले आहे की, शिंदे गट फुटल्यानंतर भाजपने शिंदेंना मोठे नेते म्हणून पुढे केले, त्यांच्याकडे धनुष्यबाण चिन्ह सोपवून त्यांना ‘शिवसेनाप्रमुख’सारखा भाव दिला, पण आता भाजपने शिंदे यांचे खरे रूप दाखवायला सुरुवात केली आहे

अग्रलेखानुसार शिंदेंचे फडणवीस यांच्याशी मतभेद आहेत, अजित पवारांशीही तणाव आहे आणि ठाण्यात भाजपचे गणेश नाईक व रवींद्र चव्हाण यांनी शिंदेंना “औकातीत” आणले आहे. ठाण्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते संजय केळकरही शिंदेंकडे “डोळे वटारून पाहायलाही तयार नाहीत”, असा टोमणा सामनाने मारला आहे.

भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर, शिंदे गट ज्या-ज्या जागांवर निवडून आला तिथे इतर पक्षांतील ताकदवान नेते भाजपमध्ये घेतले. यावरून पुढील विधानसभा निवडणुकीला भाजप शिंदेंशिवायच मैदानात उतरणार हे स्पष्ट झाल्याचे सामनाचे मत आहे.

३५ आमदार भाजपात?

एकनाथ शिंदे व त्यांच्या बरोबरचे ४० आमदार फुटले तेव्हा शिंदे हे मजबूत, महान नेते असल्याचा देखावा भाजपने तयार केला. शिंदे यांच्या हाती धनुष्यबाण व शिवसेना सोपवली. त्यामुळे आपणच शिवसेनाप्रमुख अशा तोऱ्यात शिंदे वावरले. आता भाजपने त्यांचे खरे रूप दाखवायला सुरुवात केल्यावर या सगळय़ांची दाणादाण उडाली आहे. शिंदे यांचे महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जमत नाही. अजित पवारांबरोबर त्यांचा वाद आहे. त्यात गणेश नाईक व रवींद्र चव्हाण या दोघांनी शिंदे गटाला त्यांच्या औकातीवर आणले. ठाण्यात संजय केळकरांसारखे भाजपचे जुनेजाणते नेते शिंदे यांना हिंग लावून विचारायला तयार नाहीत. भाजपने आता स्वबळाचा नारा दिला व जेथे शिंदे यांचे आमदार निवडून आले, तेथे इतर पक्षांतील ताकदीची माणसे आपल्या पक्षात घेतली. म्हणजे पुढील विधानसभेला भाजप शिंदेंशिवाय निवडणुका लढणार हे नक्की. भाजपने एक ‘पक्ष’ निर्माण केला आणि त्याला संपवण्याची तयारी आता भाजपनेच सुरू केली आहे. शिंदे गटातले किमान ३५ आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील हे स्पष्ट झाले आहे, असा दावा अग्रलेखात करण्यात आला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!