श्रीवर्धन | अनिकेत मोहित
श्रीवर्धन तहसीलदार कार्यालय परिसरात सध्या स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. कार्यालय परिसरातील सार्वजनिक स्वच्छता गृहांची दयनीय अवस्था पाहून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले जात आहे.
पाण्याची अपुरी सोय आणि साफसफाईचा अभाव यामुळे स्वच्छता गृहांतून येणाऱ्या दुर्गंधीने परिसर असह्य झाला आहे. दररोज कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना तसेच महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, महिलांसाठी असलेले सार्वजनिक स्वच्छता गृह बंद असल्याने त्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे महिला कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेले स्वच्छता गृह मात्र सर्व सुविधा आणि स्वच्छतेसह वापरात असल्याचे चित्र दिसत आहे. या असमानतेबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
कार्यालय परिसरात कचऱ्याचे ढीग, धुळीने भरलेले रस्ते आणि नियमित स्वच्छतेचा अभाव हेही चित्र अधिकच बिकट बनवत आहेत. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष घालून परिसर स्वच्छ करण्याची, तसेच सर्वांसाठी समान सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
स्थानिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, लवकरात लवकर सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.
