• Mon. Dec 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण–मुंबई आणि उरण–नवी मुंबई बेस्ट बस सेवा पहिल्यांदाच सुरू

ByEditor

Nov 16, 2025

सामाजिक कार्यकर्ते तुषार गायकवाड यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विठ्ठल ममताबादे
उरण (दि. १६):
उरण तालुक्याच्या वाहतूक प्रणालीला ऐतिहासिक बळकटी देणारा निर्णय म्हणून उरण ते मुंबई तसेच उरण ते नवी मुंबई असा बेस्ट परिवहन सेवेचा ‘चलो बस’ मार्ग आता अधिकृतपणे सुरू झाला आहे. अनेक वर्षांपासूनची स्थानिकांची मागणी अखेर पूर्ण झाली असून हा उपक्रम शक्य करण्यामागे सामाजिक कार्यकर्ते तुषार उत्तम गायकवाड यांचे सातत्यपूर्ण पाठपुरावे निर्णायक ठरले.

उरण द्रोणागिरी सेक्टर १२ येथील भूपाळी गृहसंकुलातून शुक्रवार, १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता प्रथम बेस्ट बस रवाना झाली. उरणच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई व नवी मुंबईसाठी बेस्टच्या प्रीमियम बस मार्गांची सुरुवात झाल्याने नागरिक, चाकरमानी आणि विद्यार्थी वर्गामध्ये आनंदोत्सवाचे वातावरण होते.

उरण ते अटलसेतू–मुंबई मार्गावर बससेवा सुरू करण्यासाठी तुषार गायकवाड यांनी बेस्ट प्रशासनाशी सातत्याने पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत बेस्टने उरण–बांद्रा, उरण–वाशी आणि उरण–अटलसेतू मार्गे कुलाबा असे महत्त्वाचे मार्ग सुरू केले.

बससेवेच्या उद्घाटनावेळी तुषार गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष नामदेव कुरणे, भूपाळी सोसायटीचे अध्यक्ष दिनेश पवार, नवनाथ डोके, लक्ष्मण मोटे आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेस्टच्या वतीने इन्स्पेक्टर भागवत कांबळे आणि प्रमोद कोकरे यांनी उपस्थिती दर्शवली. नारळ फोडून आणि पेढे वाटून बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.

उरण–द्रोणागिरी परिसरातील नागरिक, सरकारी कर्मचारी, चाकरमानी आणि विद्यार्थ्यांना दीर्घकाळापासून असलेल्या वाहतुकीच्या अडचणी आता मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. एसटी फेऱ्यांची कमतरता, रेल्वे सेवा नवी मुंबईपर्यंतच मर्यादित आणि प्रवासातील अनिश्चितता – या सर्व समस्यांना उत्तर म्हणून बेस्ट परिवहन आता उपलब्ध झाले आहे.

आभार प्रदर्शनात बोलताना तुषार गायकवाड म्हणाले, “उरण–मुंबई–नवी मुंबई प्रवास हा अनेक नागरिकांसाठी त्रासदायक होता. लोकांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी सेवा मिळावी म्हणून मी प्रयत्न केले. बेस्टने सेवा सुरू केल्याबद्दल मी प्रशासनाचा आभारी आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या सेवेचा लाभ घ्यावा.”

बेस्ट परिवहन ‘ चलो बस’ सेवेची वैशिष्ट्य :-

🟥 रविवार खेरीज सिडको जेएनपीटी ते नवी मुंबई, सिडको जेएनपीटी ते मुंबई (बांद्रा ), सिडको जेएनपीटी ते अटलसेतू मार्गा मुंबई या मार्गावर बस सेवा सुरु.
🟥 रात्री ९ ते रात्री १२:३० या वेळेत सिडको जेएनपीटी ते वाशी, वाशी ते सिडको जेएनपीटी अशी स्वतंत्र बस सेवा सुरु
🟥 कायमस्वरूपी ऑनलाईन सेवा आहे. नागरिकांना बस मधून प्रवास करायचे असल्यास चलो बस ऍप डाउनलोड करून ऑनलाईन नोंदणी करूनच बस मध्ये बसावे लागेल
🟥 ऑनलाईन नोंदणी किंवा ऑनलाईन बुकिंग केलेले नसेल तर बस मध्ये बसता येणार नाही.
🟥 प्रवाशी कुठेही असला तरी त्याने अगोदर ऑनलाईन नोंदणी (बुकिंग) केली तर त्याला बस मधून प्रवास करता येतो.
🟥 चलो बस ऍप मध्ये कोणती बस कुठे आहे. एखादी बस कोणत्या स्थानकावर हे ऍप मध्ये त्वरित कळणार.
🟥 प्रीमियम सेवा (व्हीआयपी सेवा) असल्याने ऑफलाईन सेवा कायमस्वरूपी बंद आहे. म्हणजेच प्रवाशांना कधीही कुठेही डायरेक्ट बस मध्ये चढता येणार नाही. ऑनलाईन बुकिंग असेल तरच बस मधून प्रवास करता येणार आहे.
🟥 द्रोणागिरी ते अटल सेतू मार्गे मंत्रालय मुंबई अशी बस सेवा सुरु.
🟥 सिडको जेएनपीटी ते बांद्रा
सिडको जेएनपीटी ते वाशी (नवी मुंबई)
🟥 थंड, वातानुकुलीत शांत आरामदायी प्रवास सेवा
🟥 जलद, सुरक्षित व उत्तम सेवा
🟥 कोणत्याही नागरिकांना चलो बस सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर चलो बस सेवा ऍप डाउनलोड करूनच प्रवास करावा लागेल. ही बुकिंग २४ तास उपलब्ध आहे.
🟥 बस सेवेचे वेळापत्रक हे चलो बस ऍप वर पाहता येणार आहे
🟥 बस तिकीटाची रक्कम ऑनलाईन बुकींग करतेवेळी दिसून येईल.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!