उरण । अनंत नारंगीकर
उरण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीत फूट पडून भाजप विरोधात शिवसेना शिंदे गटातर्फे रुपाली ठाकूर यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज आणि ६ नगरसेवक पदाचे अर्ज आज (दि. १७) रोजी वाजत गाजत शिवसेना उपनेते सुहास सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल भगत आणि उप जिल्हाप्रमुख विनोद साबळे, उरण तालुकाप्रमुख दिपक ठाकूर यांच्या उपस्थितीत अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्याकडे सादर केला.
उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने युतीचा धर्म न पाळता शिवसेना शिंदे गटाला कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले नसल्याने आज शिंदे गटाने ‘एकला चलो रे’ चा नारा देत माजी नगरसेवक तुषार ठाकूर यांच्या पत्नी रूपाली ठाकूर यांना शिवसेना शिंदे गटातर्फे अधिकृत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊन आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत सहा नगरसेवक पदाचे अर्ज दाखल करण्यात आले आहे.
यावेळी तालुका प्रमुख दीपक ठाकूर, युवा सेना जिल्हा प्रमुख प्रीतम सुर्वे, जिल्हा संघटिका मेघा दमडे, उरण विधानसभा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे सुनील भोईर, जिल्हा संघटक महेंद्र पाटील, रघुनाथ पाटील, मनोज घरत, महिला तालुका संघटक प्रगती म्हात्रे, शहरप्रमुख सुलेमान शेख,
आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्राच्या व राज्याच्या सत्तेत शिवसेना शिंदे गटाची भूमिका महत्त्वाची असून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली जनमाणसाचे प्रश्न सोडविण्याचे काम हे शिवसैनिक करत आहेत.आज उरणातील महिला या एकनाथ शिंदे साहेबांकडे लाडका भाऊ म्हणून पाहत आहे.त्यामुळे होऊ घातलेल्या उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत उरणच्या विकासासाठी उरणच्या महिला, मतदार राजा हा शिवसेनेच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार आहे.
–अतुल भगत,
जिल्हाध्यक्ष शिवसेना
