तनुजा पेरेकर नगराध्यक्षपदासाठी रिंगणात
विकासाच्या मुद्द्यावर अलिबागकर साथ देतील, आमदारांचा विश्वास
अलिबाग । सचिन पावशे
अलिबाग नगरपालिका निवडणुकीत महायुतीने आज दणदणीत शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण मिरवणुकीत शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार निवडणूक कार्यालयात दाखल झाले. नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या तनुजा पेरेकर यांनी अर्ज सादर केला, तर नगरसेवक पदांसाठीही महायुतीचे अनेक उमेदवार मोठ्या उत्साहात अर्ज भरताना दिसले.
अर्ज सादर प्रक्रियेदरम्यान आमदार महेंद्र दळवी, भाजप आमदार विक्रांत पाटील, जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा चित्रा पाटील यांसह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकीत महायुतीचा थेट मुकाबला शेकाप-काँग्रेस आघाडीशी होणार आहे.
गेल्या काही वर्षांत अलिबागच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख करत, नागरिकांचा विश्वास महायुतीवर अधिक दृढ झाल्याचा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला. “अलिबागकर परिवर्तनासाठी सज्ज असून यंदाच्या निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळेल,” असेही ते म्हणाले.
तर, आजची अर्ज दाखल प्रक्रिया ही अलिबागच्या राजकारणातील नव्या परिवर्तन अध्यायाची सुरुवात असल्याचे आमदार विक्रांत पाटील यांनी सांगितले.
