श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धन नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस असल्याने शहरात राजकीय तापमान उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. सकाळपासूनच विविध पक्षांच्या रॅल्या, घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नगराध्यक्ष पदासह १० प्रभागांमधील प्रत्येकी दोन अशा एकूण २० जागांसाठी उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे दाखल करून निवडणुकीचे रिंगण अधिकच रंगतदार केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)–भाजपा युतीने आज संघटनशक्तीचे प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदासाठी जितेंद्र सातनाक यांचा अर्ज दाखल केला. युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून घोषणाबाजीसह उमेदवारांचा उत्साह वाढवत होते. दुसरीकडे, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत सर्व १० प्रभागांत उमेदवार उभे केले असून नगराध्यक्ष पदासाठी अक्षता प्रीतम श्रीवर्धनकर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या मिरवणुकीने शहराचे लक्ष वेधून घेतले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि काँग्रेस आघाडीनेही आज १४ प्रभागांवर उमेदवारी निश्चित केली असून नगराध्यक्ष पदासाठी अतुल चौगुले यांनी अर्ज दाखल केला. आघाडीच्या रॅलीत दाखवलेले ऐक्य आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विशेष ठळकपणे जाणवला. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उमेदवार रिंगणात उतरवून निवडणुकीला आणखी चुरस आणली आहे.
दरम्यान, अपक्ष उमेदवार म्हणून पत्रकार रामचंद्र शांताराम घोडमोडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करत या लढतीत तिसरी दिशा निर्माण केली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे काही प्रभागांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सर्वच पक्षांनी आज आपल्या ताकदीचे भक्कम प्रदर्शन केल्यानंतर आता श्रीवर्धनच्या मतदारराजाचा निर्णय कोणत्या बाजूने झुकतो, याची उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचे विद्यमान वर्चस्व कायम राहणार की नवे राजकीय समीकरण पुढे येणार, हे निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
