अलिबाग (प्रतिनिधी): मांडवा जेट्टी ते अलिबाग या गर्दीच्या आणि अपघातप्रवण मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच पर्यटक, विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जड व अवजड वाहनांसाठी वाहतूकबंदी लागू केली आहे. ही बंदी अधिसूचना तत्काळ लागू करण्यात आली असून पुढील आदेश येईपर्यंत सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत अवजड वाहनांना मार्ग बंद राहणार आहे.
दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला, पाणी यांसारख्या जीवनावश्यक वस्तू वाहतूक करणारी वाहने, तसेच पोलीस, फायर ब्रिगेड आणि रुग्णवाहिका या बंदीपासून वगळण्यात आल्या आहेत.
रायगड जिल्हा हा प्रमुख पर्यटन जिल्हा असल्याने अलिबाग, मांडवा, किहिम, आक्षी, नागाव या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा होत असते. मांडवा जेट्टी मार्ग अरुंद असून येथे रो-रो सेवा आणि जलप्रवासी बोटींद्वारे मुंबईहून मोठ्या प्रमाणात वाहने येतात. या परिस्थितीत माती-खडीची वाहतूक करणारे डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर आणि अन्य अवजड वाहनेही त्याच मार्गाने धावत असल्याने वाहतूक कोंडी तीव्र स्वरूपात भासते.
यामुळे किरकोळ ते गंभीर आणि प्राणांतिक अशा अपघातांची संख्या सातत्याने वाढत असल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. विशेषतः शनिवार–रविवार या दिवशी मुंबईहून येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने विद्यार्थी, पर्यटक तसेच आजारी रुग्णांना अत्यंत मोठ्या विलंबाचा सामना करावा लागत आहे. रुग्णवाहिका कोंडीत अडकून पडल्याने रुग्णांच्या जीवितासही धोका निर्माण होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
वाहतूकबंदीच्या या आदेशामुळे मार्गावरील कोंडी कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी कार्यालयाने व्यक्त केला आहे.
