मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळाली असून ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल ५ डिसेंबरपासून वाजणार आहे. दरम्यान, राज्यातील ११२ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली असून पुढील आठ–दहा दिवसांत ते नव्या पदस्थापना स्थळी रुजू होणार आहेत. त्यांच्या रुजू अहवालांचा दैनंदिन आढावा घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या विश्वसनीय सूत्रांनुसार, उपजिल्हाधिकारी संवर्गातील रिक्त पदे पदोन्नतीतून भरल्यानंतर नोव्हेंबरअखेर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा दुसरा टप्पा जाहीर केला जाणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी महसूल व वन विभागाने पदोन्नती आदेश जारी केले असले तरी अनेक अधिकारी अद्याप नव्या ठिकाणी कार्यभार स्वीकारायचा आहे. त्यामुळे आयोगाने सर्व विभागीय आयुक्तांना संबंधित अधिकाऱ्यांच्या हजर अहवालांची मागणी केली आहे.
निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक :
- नोव्हेंबर अखेर दुसरा टप्पा जाहीर
- ५ डिसेंबरपासून अर्ज स्वीकृती सुरू
- सात दिवस अर्ज स्वीकृती, सात दिवस छाननी व अर्ज माघार
- अंतिम उमेदवार यादी जाहीर
- सहा दिवसांचा प्रचार कालावधी
- मतदान, मतमोजणी आणि प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण
महापालिकांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वीच
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत होत असून, पहिल्या टप्प्यात नगरपरिषदा व नगरपंचायतींची निवडणूक पार पडत आहे. दुसरा टप्पा जिल्हा परिषद–पंचायत समित्यांचा असून, तिसऱ्या टप्प्यात मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक एकाच वेळी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा तिसरा टप्पा ३१ जानेवारीपूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
निवडणुकांचे दोन प्रमुख टप्पे
- जिल्हा परिषदा : ३२
- पंचायत समित्या : ३३१
- निवडणुकीचा कालावधी : २३ ते २५ दिवस
- महापालिका : २९
- निवडणुकीचा कालावधी : २५ दिवस
