नगरपंचायतमधील सेवा लेखी नोटीस न देता समाप्त; ज्ञानदेव पवार यांचा पाच दिवसांत आंदोलनाचा इशारा
माणगाव । सलीम शेख
महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवते मात्र माणगाव नगरपंचायत लाडक्या बहिणींनाच कामावरून कमी करते. अशा तीव्र भावना नगरपंचायतीतून अचानक कमी करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केल्या. तर यावेळी बोलताना नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी नगरपंचायतीतून कमी केलेल्या महिला कर्मचाऱ्यांना कामावर घ्या अन्यथा शिवसेनेतर्फे येत्या पाच दिवसांत आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
माणगाव नगरपंचायतीतील दि. १ नोव्हेंबर २०२५ पासून नऊ कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे लेखी न देता केवळ तोंडी सांगून कामावरून कमी करण्यात आले होते. यापैकी पाच कर्मचाऱ्यांना काही दिवसांपूर्वी कामावर पुन्हा रुजू करून घेण्यात आले असून चार महिला कर्मचाऱ्यांना तुमचे काम असमाधानकारक असल्याचे सांगून कामावरून कमी करण्यात आले आहे. अचानकपणे कमी केलेल्या या महिलांना एक प्रकारे मानसिक धक्का बसला असून या महिलांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या महिलांना न्याय मिळावा अशी मागणी सर्वस्तरांतून जोर धरू लागली असून याबाबत बुधवार दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी माणगाव शासकीय विश्रामगृह याठिकाणी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला नगरपंचायतीतील अन्यायग्रस्त महिला कर्मचारी सोनाली वैभव पवार,वैभवी प्रकाश तळकर – खैरे,सिद्धी राजेंद्र पवार,ऋतुजा निंबाळकर यांच्यासह शिवसेनेचे नितीन दसवते,प्रसाद धारिया,सौरभ खैरे,प्रवीण बागवे,माजी नगरसेवक मनोज पवार,अभिजित पवार आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार पुढे म्हणाले, माणगाव नगरपंचायतीतील महिला कर्मचारी यांना कामावरून काढून टाकून नगरपंचायतीने त्यांच्यावर एकप्रकारे अन्याय केला आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे कधीच नगरपंचायतीत वेळेवर उपस्थित नसतात. ते अरेरावी पद्धतीने वागत असतात. अन्याय झालेल्या महिलांना वेळोवेळी तुम्हाला कामावरून काढून टाकू अशी धमकी दिलेली आहे. कमी करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्यांना दि.३१ ऑक्टोबर रोजी मुख्याधिकारी यांच्या सूचनेवरून अचानक नगरपंचायतीतील एका कर्मचाऱ्याने फोन करून तुम्ही उद्यापासून कामावर येऊ नका असे सांगितल्याने या महिलांचे पुरते खच्चीकरण होऊन त्या महिला निराश झाल्या. या महिलांनी आम्हाला अचानक का कमी करताय असा प्रश्न विचारल्यावर मुख्याधिकारी नगराध्यक्षांकडे तर नगराध्यक्षा मुख्याधिकारी यांच्याकडे पाठवू लागले. नगराध्यक्षा यांनी तर काही महिलांच्या पतींना तुम्ही आमच्या पक्षात या मग तुमच्या पत्नींना कामावर घेऊ असे सांगत गलिच्छ राजकरण केले. तुम्ही तुमचे राजकरण करा पण कर्मचाऱ्यांना वेठीस धरू नका त्यांच्या पोटावर पाय आणू नका. असे पवार यांनी सांगत या महिला कर्मचाऱ्यांना नगरपंचायतीने कामावर रुजू करून न घेतल्यास शिवसेना येत्या चार ते पाच दिवसांत आंदोलन करील असा इशारा दिला.
यावेळी बोलताना नगरपंचायतीतील अन्यायग्रस्त महिला कर्मचारी सोनाली वैभव पवार यांनी सांगितले कि, मी नगरपंचायतीत डाटा एंट्री कर्मचारी म्हणून काम करीत हॊते. आम्हाला नगरपंचायतीने कोणतेही लेखी पूर्व सूचना न देता अचानक तुम्ही उद्यापासून कामावर येऊ नका असे कर्मचारी सुनील पारखे यांनी मुख्याधिकारी यांच्या सांगण्यावरून फोन करून सांगितल्याने मला एक प्रकार धक्का बसला. याबाबत आम्ही महिला मुख्याधिकारी यांना विचारण्यासाठी गेलो असता त्यांनी मला भेटू नका नगराध्यक्षांना भेटा असे सांगत आम्हाला भेटू दिले नाही. नगराध्यक्षांकडे गेल्यावर त्यांनी हा निर्णय आमचा नसून मुख्याधिकारी यांचाच असल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी आम्हाला तुमचे काम असमाधानकारक असल्याचे सांगितले शिवाय तुम्हाला पगार देण्यासाठी नगरपंचायतीकडे नफा फंड नाही असे सांगून तुम्हला कमी करण्यात आल्याचे सांगितले. आमचे काम असमाधानकारक म्हणजे नक्की काय ? आम्ही महिला वेळेवर कामावर येऊन आवक – जावक,जन्म – मृत्यू आदी कामे पाहत होते. कामात कधीच आम्ही कचुराई केली नाही असे असताना आम्हाला कमी करण्यात आले. आमच्याबरोबर कमी करण्यात आलेल्या पाच कर्मचाऱ्यांना पुन्हा पाच दिवसांनी कामावर घेण्यात आले. नफा फंड नसताना मग त्यांना तसेच नवीन कर्मचाऱ्यांना कसे घेण्यात आले असा सवाल केला. माझ्या पतीला आमच्या पक्षात प्रवेश करा असे नगराध्यक्षांकडुन सांगण्यात आल्याचे सांगत आम्हाला राजकरणाशी काही एक देणे घेणे नसल्याचे त्यांनी सांगितले.
अन्यायग्रस्त महिला कर्मचारी वैभवी प्रकाश तळकर – खैरे मी नगरपंचायतीत गेली सहा वर्ष डाटा एंट्री म्हणून काम केले असून माझ्या सोबतच्या महिलांनीही चार ते पाच वर्ष काम केले असून आम्हाला कामावरून नगरपंचायतीने कमी करून आम्हाला एक प्रकारे मानसिक धक्का दिला आहे. सरकार लाडकी बहीण योजना राबवते मात्र माणगाव नगरपंचायत लाडक्या बहिणींनाच कामावरून कमी करते अशा तीव्र भावना त्यांनी बोलताना व्यक्त केल्या. यावेळी अन्यायग्रस्त महिला कर्मचारी सोनाली राजेंद्र पवार यांनी राजकरणाची आम्हाला मुळीच आवड नसून आमच्या गरिबांच्या पोटावर नगरपंचायतीने उठू नये. आमच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून नगरपंचायतीने आम्हाला पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे अशा भावना व्यक्त केल्या.
