श्रीवर्धन । अनिकेत मोहित
वाघोडे येथे दि. 15 नोव्हेंबर रोजी आयोजित रायगड जिल्हा कुमारी गट निवड चाचणीत कु. तनिषा सुहास साखरे हिने आपल्या क्रीडा क्षमतेचा प्रभावी ठसा उमटवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्रीवर्धन संघाचे प्रतिनिधित्व करताना तनिषाने अत्यंत दमदार आणि प्रामाणिक खेळ सादर केला. स्पर्धेतील कौशल्य, चपळाई आणि तांत्रिक खेळशैलीमुळे ती निवड समितीची आवडती ठरली.
या उत्तुंग कामगिरीच्या जोरावर तनिषाची महाराष्ट्र राज्य 52 वी कुमारी गट चाचणी स्पर्धेसाठी रायगड जिल्हा संघात अधिकृत निवड झाली आहे. 25 ते 29 नोव्हेंबर दरम्यान बोपखेल, पुणे येथे ही राज्यस्तरीय स्पर्धा होत आहे. रायगड जिल्ह्याचा झेंडा हातात घेत राज्याच्या पातळीवर श्रीवर्धनचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हे तिच्या क्रीडा प्रवासातील अत्यंत महत्त्वाचे यश ठरले आहे.
स्थानिक क्रीडांगणावरून राज्याच्या व्यासपीठापर्यंत पोहोचल्याने श्रीवर्धन शहरात आनंदाचे वातावरण आहे. तनिषाच्या सातत्यपूर्ण मेहनतीला, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाला आणि पालकांच्या प्रोत्साहनाला या यशाची साथ लाभली आहे. तिच्या कामगिरीमुळे श्रीवर्धनमधील तरुण क्रीडापटूंना प्रेरणादायी असे मार्गदर्शन मिळणार आहे.
कु. तनिषाच्या या भव्य यशाबद्दल श्रीवर्धन व रायगड जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींकडून हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होत असून राज्यस्तरीय स्पर्धेत ती आणखी उज्ज्वल कामगिरी करून नाव लौकिक करेल, अशी सर्वांची अपेक्षा आहे.
