माणगाव | सलीम शेख
माणगावपासून अवघ्या एका किलोमीटर अंतरावर कळमजे पुलाजवळ मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (दि. २६ नोव्हेंबर २०२५) सकाळी ७.१५ च्या सुमारास शिवशाही बस आणि अशोक लेलंड वाहनामध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात विक्रोळी (मुंबई) येथील शाम सुंदर गावडे (वय ८५) यांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत.
मुंबईहून मालवणकडे जाणारी शिवशाही बस (क्र. एमएच ०९ ईएम ९०७४) आणि माणगावकडून येणारे अशोक लेलंड वाहन (क्र. एमएच ४३ सीके ३४२१) यांच्यात कळमजे पुलाजवळ धडक होऊन बसचा दर्शनी भाग पूर्णतः चिरडला गेला. धडकेची तीव्रता इतकी होती की बसचा पुढील ते मागील काही भाग अक्षरशः कापल्यासारखा झाला.
अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, वाहतूक शाखा तसेच पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी प्रवाशांना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान वृद्ध प्रवासी शाम सुंदर गावडे यांचा मृत्यू झाला.
जखमी प्रवासी
अंकुश चंद्रकांत मेस्त्री (५४, आचरा-मालवण), शशिकांत शंकर तावडे (७२, पन्हाळे-रत्नागिरी), प्रशांत शशिकांत राजशिर्के (४०, शिंदेवाडी–कोडमला), सुप्रिया सुधाकर मोरे (५५, विक्रोळी-मुंबई), प्रतिभा प्रकाश नागवेकर (५९, संगमनेर–रत्नागिरी), आर्या अमित मयेकर (३८, संगमेश्वर), गायत्री अमित मयेकर (१३, संगमेश्वर), अक्षता अनंत पोळवणकर (४०), दीपाली तुकाराम मोकळ (३०, आमटेम–रायगड) आणि आयशा अमित मयेकर (६, संगमेश्वर) हे दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
अशोक लेलंड वाहनात सीएनजी असल्याने स्फोटाचा धोका निर्माण होण्याची भीती काही वेळ प्रवाशांमध्ये आणि उपस्थित नागरिकांमध्ये पसरली होती. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
