उरण । अनंत नारंगीकर
जेएनपीए बंदरा लगत असलेल्या बेलपाडा परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरातील काही नागरिकांना बिबट्या दिसला असल्याची माहिती समोर येत आहे. तरी नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.
पनवेल तालुक्यातील नितळस गाव परिसरात नुकताच बिबट्याचा मुक्त संचार आढळून आला आहे. तसेच उरण तालुक्यात मागील वर्षी बिबट्या आढळून आला होता.सध्या राज्यात बिबट्याची संख्या वाढली असून नागरिकांवर प्राण घातक हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच जेएनपीए बंदरा लगत असलेल्या बेलपाडा परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याची माहिती नागरिकांकडून समोर येत आहे. तरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यांची खातेजमा करुन बिबट्याचा बंदोबस्त ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
उरण तालुक्यात बिबट्या आढळून आलेला नाही. मात्र बेलपाडा गाव परिसरात बिबट्या आढळून आलेला असल्याचा समज आहे. खर की खोट त्याचा तपास सुरू आहे. तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, जर बिबट्या आढळून आला तर त्याची माहिती वन विभागाला देण्यात यावी.
-एन. जी. कोकरे
वन परिक्षेत्र अधिकारी उरण-पनवेल
