ना. आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना जाब
अनिकेत मोहित
श्रीवर्धन : शहरातील रास्त भाव दुकानांमध्ये धान्याच्या पोत्यांमध्ये उंदराची लेंडी व कबुतरांच्या विष्टेचे मोठ्या प्रमाणात आढळलेले प्रमाण पाहून परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच आमदार आदितीताई तटकरे यांनी संबंधित दुकानांना तात्काळ भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
धान्य स्वच्छ नसणे, साठवणुकीतील बेफिकिरी आणि दुकानांत स्वच्छता नसल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून येत होत्या. आज प्रत्यक्ष पाहणीदरम्यान धान्याच्या पोत्यांतून उंदरांची लेंडी व कबुतरांची विष्टा आढळल्याने आदितीताई तटकरे यांनी उपविभागीय अधिकारी आणि अन्नधान्य विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ धारेवर धरले.
आदितीताईंनी संबंधित दुकानांचे पंचनामे करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच धान्य गोदामे आणि सर्व दुकानांची तात्काळ स्वच्छता, फ्युमिगेशन आणि तपासणी करण्याची मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे असे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या प्रकरणामुळे श्रीवर्धनच्या नागरिकांत मोठी चर्चा असून प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.
