• Mon. Dec 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण पालिका निवडणुकीत ‘उर्दू पत्रक’ वादाने खळबळ

ByEditor

Nov 26, 2025

भाजपाचा मुस्लिम मतांसाठी जोगवा; विरोधकांचा आरोप

उरण | घनःश्याम कडू
उरण नगरपालिका निवडणुकीत भाजपाने प्रथमच उर्दू भाषेत प्रचारपत्रक काढताच तालुक्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये हे पत्रक वाटण्यात आल्यानंतर विरोधकांनी थेट भाजपावर मुस्लिम मतांसाठी जोगवा मागण्याचा आरोप केला असून वातावरण तापले आहे. सामान्य मतदारांमध्येही या मुद्द्यावर चर्चा जोर धरत आहे.

२ डिसेंबर रोजी मतदान होणार असून प्रचार शिगेला पोहोचला असतानाच भाजपाने उर्दू भाषेतील पत्रकाची वाटप मोहीम सुरू केली. विशेष म्हणजे, ज्या प्रभागांमध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे, त्या भागांमध्ये हे पत्रक वाटले गेले नाही. उलट, प्रभाग ४ मध्येच जिथे कोणताही मुस्लिम उमेदवार नाही तेथेच या पत्रकाचे वितरण झाले. त्यामुळे “उर्दू पत्रक प्रभाग ४ मध्येच का?”, “नेमका उद्देश काय?” असे प्रश्न मतदारवर्गात उपस्थित होत आहेत.

उरणमधील कोणत्याही पूर्वीच्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत निवडणुकीत कधीही उर्दू भाषेत प्रचारपत्र वाटले गेले नव्हते. त्यामुळे भाजपाचा हा अचानक घेतलेला ‘उर्दू वळण’ चर्चेचा मुख्य विषय बनला आहे. यानंतर भाजपाने बोरी परिसरात मुस्लिम समाजासाठी जेवणावळही आयोजित केली. प्रत्युत्तरादाखल महाविकास आघाडीनेही समांतर जेवणावळ ठेवत राजकीय तापमान आणखी वाढवले.

या संपूर्ण प्रकरणावर मनसे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी भाजपावर जोरदार टीका केली. “मुस्लिम मतं आम्हालाही हवीत, पण मराठीत! उरणचा मुस्लिम समाज मराठीच समजतो. उर्दू पत्रकाची कधीच गरज नव्हती,” असे त्यांनी स्पष्ट सांगितले. तसेच, “पत्रक खास बोरीतच का वाटले? उरणच्या इतर मुस्लिम वस्त्या का गाळल्या? या निवडक पत्रकबाजीत कोणाचा स्वार्थ दडलेला आहे?” असेही त्यांनी आमदार महेश बालदी यांना विचारले.

महाविकास आघाडीनेही भाजपावर टीकास्त्र सोडले. माजी आमदार मनोहर शेठ भोईर म्हणाले, “भाजप गेल्या १५–२० वर्षांपासून सत्तेत आहे. सत्ता गळतीची भीती निर्माण झाल्यानेच मुस्लिम समाजाला खुश करण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. उरणकर हुशार आहेत; ते या उर्दू खेळाला बळी पडणार नाहीत.”

दरम्यान, भाजप आमदार महेश बालदी यांनी सर्व आरोप फेटाळून लावत प्रतिप्रश्न केला, “उर्दू पत्रक काढलं तर काय बिघडलं? उर्दू ही देशातील मान्य भाषा आहे. प्रचाराला भाषा कसली अडचण?” असे त्यांनी प्रतिउत्तर दिले. मात्र त्यांच्या प्रतिक्रियेनंतरही विरोधकांचा हल्ला कमी होताना दिसत नाही.

निवडणुकीस अवघे काहीच दिवस शिल्लक असताना ‘उर्दू पत्रक’ वादामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उर्दू पत्रकाचा फायदा कोणाला, फटका कोणाला याचा फैसला आता ३ डिसेंबरचा निकालच ठरवणार.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!