पेण । विनायक पाटील
गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नेहमी तत्पर असलेल्या चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया (CFI) संस्थेमार्फत यंदाही उच्चशिक्षणासाठी महत्त्वपूर्ण मदत जाहीर करण्यात आली. संस्थेच्या वार्षिक उपक्रमांतर्गत एकूण 137 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेले धनादेश प्रदान करण्यात आले.आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून दूर राहण्याची वेळ येऊ नये, हा CFIचा मुख्य हेतू या माध्यमातून पुन्हा अधोरेखित झाला.
या प्रेरणादायी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजू पिचिका,मेधा देवधर आणि स्वाती गांधी उपस्थित होते. तसेच संस्थेचे सीईओ डॉ.किशोर देशमुख यांची विशेष उपस्थिती लाभली. पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना धनादेशांचे वितरण करण्यात आले आणि या प्रसंगी सभागृहात उत्साहाचे वातावरण पसरले होते.
यानंतर पाहुणे तसेच डॉ. देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत उच्चशिक्षण, करिअर नियोजन, ध्येय निर्धार आणि प्रगतीची दिशा याबाबत मौलिक मार्गदर्शन दिले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला. कार्यक्रमात विद्यार्थी आणि पालकांनीही आपली मनोगते व्यक्त करत CFIच्या सातत्यपूर्ण मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सीएफआयच्या अशाच उपक्रमांमुळे गेल्या अनेक वर्षांत हजारो विद्यार्थ्यांनी आपले उच्चशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून विविध क्षेत्रांत उच्च पदांवर मजल मारली आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने केवळ स्वतःचे आयुष्य घडवले नाही, तर CFI संस्थेचा लौकिकही वाढवला आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने आधार, आशा आणि उज्ज्वल भविष्यासाठीची मजबूत पायाभरणी आहे. समाजातील प्रत्येक होतकरू विद्यार्थ्याला संधी मिळावी, यासाठी CFI संस्था पुढेही अशाच प्रकारे कार्यरत राहणार आहे.
