क्रीडा प्रतिनिधी
रायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या चौदा वर्षाखालील मुलांच्या आंतरजिल्हा दोन दिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाने दमदार कामगिरी करत सुपर लिगमध्ये दिमाखदार प्रवेश मिळवला आहे.
पुणे येथे एमसीएच्या वतीने सुरू असलेल्या चौदा वर्षाखालील मुलांची दोन दिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. त्यामध्ये साखळी फेरीच्या झालेल्या पाच सामन्यात रायगडच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली असून १९ गुण प्राप्त करत सुपर लिग फेरीच्या सामन्यांसाठी काल आपला प्रवेश निश्चित केला आहे. साखळी फेरीतील झालेल्या पाच सामन्यांमध्ये रायगडच्या संघाने दक्षिण विभाग व स्टार क्रिकेट अकॅडमी संघावर एका डावाने दणदणीत विजय मिळवला तर लातूर जिल्ह्याच्या संघावर पहिल्या डावाच्या आधारे विजयी मिळवला असून बलाढ्य अशा केडन्स क्रिकेट अकॅडमी व मेट्रो क्रिकेट अकॅडमी संघाबरोबरचा सामना अनिर्णित ठेवण्यामध्ये रायगडच्या संघाला यश आले आहे.
आपल्या “एच” गटात रायगडच्या संघाने एकूण १९ गुण प्राप्त करत सुपर लिगमध्ये दिमाखदार प्रवेश मिळवला आहे. साखळी फेरीत झालेल्या पाच सामन्यात रायगडच्या तंत्रशुद्ध तडाखेबाज फलंदाज आरव बरळ यांनी सर्वाधिक ४१५ धावा काढल्या त्यामध्ये दोन शतक व एका अर्धशतकाचा समावेश आहे तर अष्टपैलू खेळाडू व रायगडचा कर्णधार देव सिंग यांनी ३८७ धावा केल्या. त्यामध्ये दोन शतकं व एक अर्धशतकाचा समावेश आहे. गोलंदाजी विभागात रायगडचा भेदक गोलंदाज विराज थोरात यांनी सर्वाधिक १९ बळी घेतले. त्यामध्ये एका डावात ५ बळी त्यांनी दोन वेळा घेतले आहेत, तर देव सिंग यांनी १५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवा आहे.
रायगडच्या संघाचे प्रशिक्षक सागर कांबळे यांनी खेळाडूंनी मैदानावर केलेल्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. सुपर लिगचे सामने दिनांक २७ नोव्हेंबरपासून पुण्यातील विविध मैदानांवर होणार असून रायगड जिल्ह्याचा संघ जेट्स क्रिकेट अकॅडमी, केडन्स क्रिकेट अकॅडमी, चंद्रवोस क्रिकेट अकॅडमी व सहारा क्रिकेट अकॅडमीच्या संघाबरोबर खेळणार आहे. गेल्या क्रिकेट हंगामात रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा सोळा वर्षाखालील मुलांचा संघ देखील सुपर लीगसाठी पात्र झाला होता. रायगडच्या ज्युनिअर वयोगटातील संघ सातत्यानं यश मिळवत असल्याबद्दल जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदीप नाईक यांच्या सह आरडीसीएचे सर्व पदाधिकारी व सदस्य, जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमी लोकांनी संघाचे, प्रशिक्षकांचे व सिलेक्टर्स यांचे अभिनंदन केले व पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
