अलिबाग । सचिन पावशे
लांबलेल्या पावसामुळे रब्बी हंगामाची लागवड देखील पुढे गेली. या वर्षी पावसाने आपला मुक्काम लंबल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालं आहे. तयार झालेले पीक पावसामुळे खराब झाले. आता रब्बी हंगामावर नियोजन केले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यानी कडधान्याच्या लागवडीला अधिक प्राधान्य दिले आहे. सुमारे १३ हजार ७५० हेकटर वर कडधान्य, तर तीन हजार ५०० हेक्टरवर भाजीपाला लागवडीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
रायगड जिल्ह्यात वाल, हरभरा, मूग, मटकी, यासारखी कडधान्य घेतली जातात.अलिबाग, महाड , माणगाव या ठिकाणी कडधान्य पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसेच उन्हाळी भात शेतीचे पीकही रोहा, माणगाव या तालुक्यात घेतात. पावसामुळे खराब हंगामात झालेल्या नुकसानीनंतर रब्बी हंगामातील लागवडीवर शेतकऱ्यांचे लक्ष आहे. भात शेतीचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यामुळे रब्बी हंगामा मधील पिकांसाठी नियोजन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अलिबाग तालुक्यात गावठी वाल आणि पांढरा कांदा याचे उत्पन्न मोठ्याप्रमाणावर घेतले जाते. गावठी वाल हे टपोरे आणि रुचकर असतात. हे वाल पोपटीसाठी प्रसिद्ध आहेत. यंदा पाऊस लांबल्याने अनेक शेतकरी अडचणीत आहेत. त्यांचा परिणाम थेट आर्थिक नियोजनावर होतो. शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती सरकारच्या मदतीची, मात्र अजूनही पदरी निराशा आहेच.
जिल्ह्यातील कडधान्यांना इतर जिल्ह्यातही मागणी असते. त्यामुळे शेतकरी कडधान्य लागवडीला प्राधान्य देतात. मात्र भात झोडपणीची कामे अजूनही सुरु आहेत. जिल्ह्यात पालक मेथी कोथिंबीर मुळा गाजर बिट वांगी काकडी तोंडली कलिंगड यासह इतर पिके घेतली जातात.
यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस लांबल्याने भातकापणीची कामे पूर्ण झालेली नाहीत कृषी विभागाच्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करावा. शेतकऱ्यांना नुकसान नुकसान भरपाई साठी पाठपुरावा सुरु आहे.
-वंदना शिंदे
जिल्हा कृषिअधिक्षक रायगड
