• Mon. Dec 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणच्या लढणाऱ्या लेकीला निवडून द्या, विकासाऐवजी दलाली करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा; आव्हाडांची थेट टोकाची टीका

ByEditor

Nov 27, 2025

उरण । घन:श्याम कडू
“भावना घाणेकर माझी लढणारी बहीण आहे. झुकणारी नाही. उरणची लेक आहे, २४ तास जनतेसाठी उपलब्ध असते. नवऱ्याच्या इशाऱ्यावर चालणारी स्त्री नाही. तिला उरणकरांनी भरघोस मतांनी विजयी करावं,” असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उरणकरांना व्हिडिओ कॉलद्वारे केले.

ठाण्यातील संविधान बचाव मोर्चा दीर्घकाळ चालल्याने प्रत्यक्ष सभेला येणे शक्य झाले नाही, याची त्यांनी क्षमायाचना केली. मात्र उशीरा झालेल्या या सहभागानंतर त्यांनी केलेली भाषणातील प्रखर घणाघाती टीका उरणच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण करणारी ठरली.

आव्हाड यांनी स्थानिक आमदारांवर थेट निशाणा साधत विचारले, “गेल्या दहा वर्षांत उरणमध्ये नेमकं काय विकास केलं? एखादं ठोस काम उरणकरांसमोर दाखवता येईल का? आमदारांना जेएनपीटीची दलाली करण्याशिवाय दुसरं काही काम दिसतं का?” असा कडक सवाल त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, “आजच्या राजकारणात पैसा, विक्री, गद्दारी यांनाच महत्त्व मिळत आहे. निती, मूल्य, तत्त्वं या शब्दांची किंमत उरलेली नाही. उरणकरांनी या पैशाच्या राजकारणाला थारा देऊ नये.”

आव्हाड म्हणाले, “राजकारणात स्त्री तेव्हाच पुढे जाते जेव्हा तिचा नवरा पॉवरफुल असतो, असा समज समाजात आहे. पण भावना घाणेकर हा त्या समजाला खोडून काढणारा धडा आहे. तिच्या मागे उरणची जनता, शरद पवार, सुप्रिया सुळे, आमचा पक्ष आणि सर्व समविचारी पक्षांची ताकद आहे.”

भावना घाणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्ष आणि इतर समविचारी पक्षांना एकत्र आणल्याचे त्यांनी गौरविले.

दरम्यान, उरणच्या मस्जिद मोहल्ल्यात महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांच्या उमेदवारांची सभा उत्साहात पार पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा नेत्या मर्झिया पठाण उपस्थित होत्या, तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा व्हिडिओ कॉलद्वारे जनता संपर्क साधला.

सभेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी आमदार महेश बालदींवर तीव्र निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “आपल्या उरणची कन्या यशश्री शिंदे हिचा मृत्यू झाल्यानंतर मंत्री नितेश राणे मुस्लिम समाजाला टार्गेट करत होते. त्या वेळी उरणचे आमदार एक शब्द बोलले नाहीत; मुस्लिम बांधवांच्या पाठीशी उभे राहण्याची हिंमत दाखवली नाही. आता मात्र निवडणूक लागली म्हणून मुस्लिम मतांसाठी उर्दूमध्ये ‘दावत’ची पत्रके काढून राजकारण सुरू केले आहे. हा दांभिकपणा उरणकरांनी ओळखावा.”

भावना घाणेकर म्हणाल्या, “भाजप संपूर्ण देशभर ‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणत समाजाला विभागत आली आहे. पण उरणमध्ये आम्ही ‘जुडेंगे तो बढेंगे’ या विचाराने सर्व समाजांना साथ घेऊन विकासाचा मार्ग तयार करणार आहोत.”

संयुक्त सभेला प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभा एकतेचा, धर्मनिरपेक्षतेचा आणि बदलाच्या निर्धाराचा संदेश देत यशस्वीरीत्या पार पडली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!