मतदार राजाला खुश करण्यासाठी प्रलोभनांचा पाऊस!
महाड | मिलिंद माने
रायगड जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून रविवार, 30 नोव्हेंबर रोजी प्रचाराची मुदत संपणार आहे. शेवटच्या दोन दिवसांत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून मतदारराजाला खुश करण्यासाठी प्रलोभनांचा पाऊस पाडण्याची स्पर्धा सुरू झाल्याचे जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषद क्षेत्रांत स्पष्टपणे दिसत आहे.
थंडीचा जोर वाढला असला, तरी उमेदवार आणि कार्यकर्ते मध्यरात्रीपर्यंत मतदारांच्या दारात जाऊन पायघड्या घालत असल्याची चित्रे जवळपास प्रत्येक प्रभागात पाहायला मिळत आहेत.
१० नगरपरिषदांमध्ये टोकाची लढत
महाड, श्रीवर्धन, मुरूड, रोहा, अलिबाग, पेण, उरण, कर्जत, माथेरान आणि खोपोली या नगरपरिषदांत यंदा नगरसेवक पदांसोबतच नगराध्यक्ष पदासाठीही तिरीमिरीची लढत रंगली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या तिन्ही सत्ताधारी गटांमध्येच आरोप–प्रत्यारोपांचे सत्र जोरात सुरू असून वातावरण तापले आहे.
पाकिटांपासून ऑनलाइन व्यवहारांपर्यंत… प्रलोभनांचे नवे प्रयोग
नगराध्यक्ष पदासाठी ‘आर्थिक बोली’ सुरू असल्याच्या चर्चेला आणखी वेग मिळाला आहे. नगराध्यक्ष पदासाठी मतदारांना 10 हजार रुपये, तर नगरसेवक पदासाठी 5 हजार रुपये असे आर्थिक प्रलोभन दिल्याची चर्चा जिल्ह्यात सर्वत्र रंगली आहे. अनेक ठिकाणी मतदारांना पाकिटे वाटणे, ऑनलाइन व्यवहार करणे, तर काही प्रभागांमध्ये नामवंत हॉटेलमध्ये रंगीत संगीतासह जेवणावळींच्या मेजवान्या आयोजित केल्याचेही समोर येत आहे.
नगरपरिषद क्षेत्रातील हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत हाउसफुल असल्याचे दिसून येत आहे. जे जेवणासाठी येऊ शकत नाहीत, अशा मतदारांच्या घरी बिर्याणी किंवा त्यांच्या पसंतीचा भोजनप्रसाद ‘होम डिलिव्हरी’ने पोहोचवला जात असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.
प्रशासन आणि पोलिस यंत्रणा ‘मूक’?
आर्थिक वाटप उघडपणे सुरू असल्याची चर्चा असतानाही जिल्ह्यातील कोणत्याही नगरपरिषद क्षेत्रातून अधिकृतपणे एकही तक्रार नोंदवली गेली नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना सोयीची भूमिका प्रशासन व पोलिस यंत्रणा घेत असल्याची चर्चा मतदारांमध्ये रंगू लागली आहे.
नाकाबंदीची औचित्यताच कुठे?
निवडणूक काळात जिल्ह्यातील विविध ठिकाणी रात्री पोलिसांकडून नाकाबंदी केली जात आहे. मात्र प्रत्यक्षात पैशांची देवाणघेवाण ऑनलाइन होत असल्याने ही नाकाबंदी फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. सामान्यांच्या वाहनांची कसून तपासणी होत असताना प्रत्यक्षात मतदारांना पैसे देणारे मात्र पोलिस आणि निवडणूक यंत्रणेला हुलकावणी देण्यात यशस्वी होत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीची ही रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे. प्रलोभनांचे वाढते प्रमाण, तीव्र आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या भूमिकेवर उठलेले प्रश्न यामुळे निवडणूक वातावरण अधिकच गरम झाले आहे.
