• Mon. Dec 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अलिबागमध्ये अघोरींची रहस्यमय वर्दळ; निवडणूक काळात जादूटोण्याचा संशय

ByEditor

Nov 28, 2025

अलिबाग : नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर अलिबाग शहरात अघोरी विद्या, जादूटोणा आणि अंधश्रद्धेचा आधार घेऊन मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सात ते आठ गाड्यांमधून आलेल्या कथित अघोरी भोंदू बाबांचा गट शहरात फिरत असल्याचे अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केला आहे. या सर्व प्रकारामुळे निवडणुकीच्या वातावरणाला विचित्र व संशयास्पद कलाटणी मिळाली आहे.

सदर गाड्या मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील असल्याचे दिसून आले आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, हे भोंदू बाबा कोळीवाडा, मोहल्ला, कस्टम बंदर परिसरात फिरताना दिसले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. एवढेच नव्हे तर, एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे जाऊन विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी टाळाटाळीची उत्तरे दिली. पोलिसांना बोलावण्याची चेतावणी मिळताच त्यांनी परिसर सोडल्याचे सांगितले जात आहे.

हे लोक नेमके कोण? त्यांना येथे कोणी आणले? ते निवडणुकीच्या काळात कोणत्या ‘विशेष कामगिरी’साठी अलिबागमध्ये दाखल झाले? या प्रश्नांवर शहरभर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अस्तित्वात अशा प्रकारच्या जादूटोणा करणाऱ्या भोंदूंना शहरात मुक्त संचार कसा, याबद्दलही नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.

निवडणूक काळात अफवा, प्रलोभने, आर्थिक व्यवहारांच्या चर्चा नेहमीच रंगत असतात; पण आता अघोरी विद्या आणि जादूटोण्याद्वारे मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तातडीने तपास करून संबंधित गाड्या व व्यक्तींची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. शहरातील वातावरण तापवणाऱ्या या प्रकरणाचे सत्य पोलिसांनी लवकरात लवकर उघड करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!