धाटाव I शशिकांत मोरे
इंटरनेटचे जाळे पसरल्यानंतर खऱ्या अर्थाने डिजिटल क्रांती झाली. आज निवडणूक प्रचार यंत्रणेत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर होत असून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी रिल्सद्वारे प्रचारात आघाडी घेतली दिसत आहे. पूर्वीच्या निवडणुकीचा प्रचार आणि सध्याच्या प्रचार यामध्ये खूप बदल झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वी उमेदवारांचे पोस्टर्स गावागावातील भिंतीवर दिसायचे, घोषवाक्याने भिंती रंगायच्या. ताई, माई अक्काच्या घोषणा ऐकवयास मिळायच्या. परंतु सध्याची हायटेक प्रचार यंत्रणा पाहिली तर आज घरोघरी प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आले आहे. त्यामुळे घरबसल्या सोशल मीडियाद्वारे निवडणुकीची सर्व माहिती मतदारांना मिळत आहे. उमेदवार करीत असलेली सामाजिक, राजकीय सेवा प्रभागातील विकास कामे हे काम ते रिल्सच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. एकंदरीत सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा राबवली जात असलेले दिसून येत आहे. तर प्रचार करण्यास उमेदवारांना सुद्धा सोपे जात आहे.
रोहा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) हे महायुतीतीलच दोन्ही पक्ष आमने-सामने उभे ठाकले आहेत. दोन्ही पक्षाचे लोकप्रतिनिधी आमदार, खासदार यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शिल्पा धोत्रे यांनी शिवसेनेत उडी घेतल्याने सर्वांना परिचयाचे उमेदवार मिळाल्याने शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. सर्व शिवसैनिक मंत्री भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष मनोजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तन-मन-धनाने काम करीत आहेत. सेनेच्या मंत्री व आमदारांनी रोहा नगरपालिकेवर भगवा फडकवण्याचे मनात ठरवल्याने या निवडणुकीला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे.
आतापर्यंत रोहा नगरपालिकेमध्ये जितकी टर्म निवडणुका झाल्या त्यामध्ये राष्ट्रवादीनेच सरशी मारली आहे. सुनील तटकरे यांचे कुशल नेतृत्व व डावपेजी राजकारण कामी आले आहे. परंतु, सध्या शिवसेना सुद्धा सत्तेत आहे. त्यामुळे येथील उमेदवारांना त्यांच्या नेते गणांची खूप मोठी ताकद मिळत आहे. त्यामुळे रोह्यात यंदाच्या निवडणुकीत चित्र थोडे वेगळे आहे. दोन्ही पक्षांकडून निवडणूक प्रचार यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. या निवडणूकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले असल्याचे प्रामुख्याने जाणवते.
