नवी मुंबई : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांमध्ये मतदानापूर्वी लागू असलेल्या निवडणूक प्रचारबंदीच्या नियमांमध्ये राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा बदल केला आहे. विविध आदेश व अधिनियमांमध्ये भिन्न उल्लेख आढळत असल्याने या तरतुदी एकसमान करण्याच्या उद्देशाने आयोगाने प्रचार थांबविण्याची वेळ निश्चितपणे मतदानाच्या आधीच्या दिवशी रात्री १०.०० पर्यंत केली आहे. कोंकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्हयातील नगरपारिषदांचे मतदान दि. २ डिसेंबर २०२५ रोजी आसल्याने सुधारित अदेशानुसार दि. १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १०.०० नंतर सभा, मोर्चे, ध्वनीक्षेपाचा वापर करता येणार नाही. प्रचार बंद होईल. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.
महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५’ मधील कलम २३ नुसार मतदानाच्या दिवशी कोणतीही जाहिर सभा आयोजित करणे, भरविणे किंवा त्यात सहभागी होणे प्रतिबंधित आहे. मतदानादिवशी शांतता राखण्यासाठी ही तरतूद लागू आहे. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या “प्रसार माध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, २०२५” मध्ये मतदानाच्या एक दिवस आधी रात्री १२ पासून प्रचारबंदी लागू असे नमूद होते. तसेच ४ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या ‘आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश’ मध्ये मतदानाच्या २४ तास आधीपासून प्रचारबंदीचा उल्लेख होता. विविध आदेशांतील या वेळेतील फरकामुळे निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये आणि उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होत होता.
या सर्व बाबींचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने ०४ नोव्हेंबर २०२५ च्या एकत्रित आदेशातील मुद्दा क्रमांक ६ (२) मध्ये सुधारणा केली आहे. आता पुढीलप्रमाणे नियम लागू राहतील :
मतदानाच्या आधीच्या दिवशी रात्री १०.०० वाजता सर्व प्रकारचा निवडणूक प्रचार पूर्णपणे थांबवावा.
त्या वेळेनंतर सभांचे आयोजन, मोर्चे, प्रचारफेऱ्या किंवा ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास बंदी राहील.
निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी व प्रसारण देखील तत्काळ थांबवावे.
ही सुधारित तरतूद आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये एकसमानपणे लागू राहणार आहे. संबंधित सर्व अधिकृत आदेशांमध्ये हीच वेळ बंधनकारक असेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. नागरिक, उमेदवार, राजकीय पक्ष, माध्यमे आणि स्थानिक निवडणूक यंत्रणांनी या सुधारित नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकांणी यांनी केले आहे.
